Join us
Daily Top 2Weekly Top 5

Arshdeep Singh: ...म्हणून मी माझ्या मुलाला गोलंदाजी करताना पाहत नाही; अर्शदीप सिंगच्या आईने सांगितल्या भावना

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 14:01 IST

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. भारताकडून युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी पटकावले. त्याने पाकिस्तानचे दोन्हीही सलामीवीर यांना स्वस्तात माघारी पाठवले. आशिया चषकात पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आसिफ अलीचा झेल सोडल्यानंतर त्याला खूप ट्रोल केले जात होते. मात्र आता २३ वर्षीय गोलंदाजांने सर्वांना सडेतोड उत्तर दिले असून विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने ४ षटकांत ३२ धावा देऊन ३ बळी घेतले. भारताच्या विजयात अर्शदीप सिंगने महत्त्वाची भूमिका पार पाडली. 

अर्शदीप सिंगच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचे पालक खूप उत्सुक आहेत. खरं तर त्याची आई बलजीत कौर आपल्या मुलाला गोलंदाजी करताना क्वचितच पाहतात. इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, हे तेव्हापासून सुरू झाले आहे जेव्हापासून तो भारतासाठी खेळायला लागला आहे. सामन्यादरम्यान त्या एकतर गुरुद्वारामध्ये असतात किंवा गुरु नानक देव यांच्यासमोर पूजा करत असतात. तसेच "जेव्हा तो पहिल्यांदा भारताकडून खेळला तेव्हापासून मला ही सवय लागली आहे. कारण तो नेहमीच कठीण परिस्थितीत षटके टाकत असतो.मला खेळाबद्दल फारशी माहिती नाही. पण मी त्याच्याविरुद्ध धावा करताना फलंदाजांना पाहू शकत नाही", असे अर्शदीप सिंगच्या आईने अधिक सांगितले.

त्याची खिल्ली उडवल्याने त्रास होतो - दर्शन सिंगअर्शदीप सिंगच्या खराब खेळामुळे सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जाते तेव्हा आम्हा पालकांना वाईट वाटते. मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, असे वडील दर्शन सिंग यांनी सांगितले. पण अर्शदीपची आई हे सगळं जास्त मनावर घेते. सोशल मीडियावरील कृत्ये पाहून ती रडते. मी तिला अनेकदा सांगितले आहे, तू हे थांबवू शकत नाहीस. कालच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले होते.

टी-२० हा फलंदाजांचा खेळ अर्शदीपच्या वडिलांनी सांगितले की, टी-२० हा खासकरून फलंदाजांचा खेळ आहे. मी स्वतः एक गोलंदाज आहे, असे नेहमीच होत असते. कोणीही दररोज चांगली कामगिरी करू शकत नाही. वाईट दिवस येतो. मोठा झाल्यावर अर्शदीपला प्रेरणा घेण्यासाठी इतर कुठेही पाहण्याची गरज भासली नाही. त्याने माझ्याकडून वेगवान गोलंदाजीचे बारकावे शिकून घेतले. असे दर्शन सिंग यांनी आणखी सांगितले. 

भारताचा 'विराट' विजयपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा करून पाकिस्तानच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम डावाच्या दुसऱ्याच षटकांत बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने बाहेरचा रस्ता दाखवला. अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात माघारी पाठवून भारताला चांगली सुरूवात करून दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये पाकिस्तानने डाव सावरला आणि २० षटकांत ८ बाद १५९ धावा करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना किंग कोहलीने ऐतिहासिक खेळी केली. 

भारतीय गोलंदाजांची सांघिक खेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना १-१ बळी घेण्यात यश आले. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर संघाच्या अवघ्या १० धावांवर माघारी परतले होते. मात्र विराट कोहलीने सावध खेळी करून डाव सावरला. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल हेही स्वस्तात परतले. संघाची धावसंख्या ३१ असताना ४ गडी बाद झाले होते. अशा स्थितीत किंग कोहलीने संघाचा डाव सावरला आणि अखेरच्या षटकापर्यंत नेला. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

कोहलीची शानदार नाबाद खेळीहॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तानअर्शदीप सिंगट्रोलभारतीय क्रिकेट संघ
Open in App