क्रिकेटचा देव मानला जाणारा 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर सध्या आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा येत्या मार्च महिन्यात पार पडणार आहे. या विशेष सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी सचिनने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सचिनने सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींना दिले आमंत्रण!
सचिनने 'एक्स'वर पोस्ट करत लिहिले की, "आम्हाला अर्जुन आणि सानियाच्या विवाह समारंभासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आमंत्रित करण्याचे सौभाग्य लाभले. या जोडीला तुमचा आशीर्वाद आणि मोलाचा सल्ला मिळाला, त्याबद्दल मोदीजींचे मनःपूर्वक आभार." या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी तेंडुलकर कुटुंबाशी संवाद साधला आणि अर्जुनला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोण आहे सचिनची सून सानिया चंडोक?
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक ही मुंबईतील सुप्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब 'हॉस्पिटॅलिटी' आणि खाद्य क्षेत्रात मोठे नाव असून, 'ब्रुकलिन क्रीमरी'सारखा आईस्क्रीम ब्रँड आणि 'इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल'ची मालकी त्यांच्याकडे आहे. सानिया स्वतः एक 'वेटरनरी टेक्निशियन' आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांचा साखरपुडा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता.
५ मार्चला रंगणार शाही विवाह सोहळा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचे विधी ३ मार्चपासून सुरू होतील आणि ५ मार्च रोजी मुंबईत हा शाही विवाह सोहळा पार पडेल. याआधी सचिनने पत्नी अंजलीसह सोनिया गांधी यांचीही त्यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले होते.
२५ वर्षीय अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे, मात्र आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी त्याला लखनऊ सुपर जायंट्सने ट्रेड केले आहे. आता नव्या संघात आणि आयुष्याच्या नव्या इनिंगमध्ये अर्जुन कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.