Join us

अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?

अर्जुन तेंडुलकर फिल्डबाहेरील खास गोष्टीमुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:19 IST

Open in App

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडलाय. क्रिकेटच्या मैदानात स्थिरावण्यासाठी धडपडणारा अर्जुन तेंडुलकर याने मुंबईतील प्रतिष्ठित व्यावसायिक रवी घई यांची नात सानिया चांडोक हिच्यासोबत साखरपुडा उरकल्याचे समोर येत आहे. "सारा जमाना..." त्याची मोठी ताई कधी अन् कुणासोबत लग्न करणार याची उत्सुकतेनं वाट बघत असताना धाकट्याने पहिला माझा नंबर असं म्हणत बोहल्यावर चढण्याची पहिली पायरी चढलीये. अर्जुन तेंडुलकर हा बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चमकदार कामगिरी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. पण तो क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. सचिनचं मोठं नाव असल्यामुळे आपोआप निर्माण होणारा अपेक्षांचा दबाव, हे देखील त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील संघर्षामागचं एक कारण असू शकते. 

  लग्नाच्या तयारीला लागला म्हणजे त्याची क्रिकेट कारकिर्द संपली का?

आता तो लग्नाच्या तयारीला लागलाय म्हणजे त्याची क्रिकेट कारकिर्द संपली का? असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण लग्न जमलं की, बऱ्याच गोष्टी बदलतात असा एक समज आपल्याकडे आहे. खरं तरी ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार ती बदलते. याची काही उदाहरणेही आहेत. क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांची क्रिकेट कारकिर्द लग्नानंतर बहरली आहे. आयुष्यात नव्या जोडीदाराची एन्ट्री झाल्यावर अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दही फुलणार का? सानिया त्याच्यासाठी लकी लेडी ठरणार का? या प्रश्नाची उत्तर येणारा काळच देईल. इथं आपण जाणून घेऊयात क्रिकेटच्या मैदानातील अशा स्टार क्रिकेटर्सबद्दल ज्यांची कारकिर्द लग्नानंतर अधिक उंचावल्याचे पाहायला मिळाले आहे.  कोहली अनुष्का जोडी जमली अन्.... 

आपल्या धमाकेदार कामगिरीनं क्रिकेट जगतात रनमशिन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहलीही लग्नानंतर क्रिकेट कारकिर्दी उंचावलेल्या क्रिकेटरपैकी एक आहे.  किंग कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी केलीये. अनुष्कासोबत डेटिंगच्या चर्चा रंगत असताना त्याच्या कामगिरीचा आलेख घसरल्याचेही पाहायला मिळाले. काहींनी तर त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला अपशकुनी असं ही म्हटलं पण विराटनं ते खोटं ठरवलं. २०१७ मध्ये अनुष्कासोबत विवाहबंधनात अडकल्यावर त्याची कारकिर्द कमालीची सुधारली. सातत्याने तो दमदार कामगिरी करताना दिसला. खुद्द विराट कोहलीनं आपल्या यशात अनुष्काचा मोठा वाटा असल्याचेही बोलून दाखवले आहे. कारकिर्द बहरण्यात आयुष्याचा जोडीदार एक महत्त्वपूर्ण रोल निभावू शकतो, ही गोष्टच विरुष्काच्या पार्टनरशिपमधून दिसून येते. 

रोहितच्या आयुष्यात रितिकाची एन्ट्री झाली अन् तो 'हिटमॅन' ठरला

भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०१५ मध्ये रितिका सजदेहसह आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. तिच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यावर रोहित शर्माची वनडे आणि कसोटीतील कामगिरीत कमालीची सुधारणा झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते.  लग्नाआधी कसोटीत रोहितची सरासरी ३३.१८ तर वनडेतील सरासरीचा आकडा हा ३९ च्या आसपास होता. लग्नानंतर कसोटीत तो ५७ तर वनडेत ६२ च्या जवळपास पोहचला. लग्नानंतर त्याने वनडेत द्विशतकी खेळीचा कमालीचा सिलसिला दाखवून दिला. त्यामुळेच त्याला हिटमॅनचा टॅगही लागल्याचे पाहायला मिळाले.

अजिंक्य रहाणेची  राधिकासोबत जोडी जमली अन् क्रिकेटरची कारकिर्दही बहरली

लग्नानंतर क्रिकेटच्या मैदानातील विघ्न दूर होऊन कामगिरीत सुधणार झालेल्या क्रिकेटर्समध्ये अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. २०१४ मध्ये राधिका धोपावकर हिच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यावर अजिंक्य रहाणेच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. लग्नाआधी कसोटीत ३९ च्या सरासरीसह धावा काढणाऱ्या अजिंक्यची सरासरी थेट ५८ एवढी झाली. वनडेतही तो २७ च्या सरासरीवरून ३७ च्या घरात पोहचल्याचे दिसते.

डेविड वॉर्नरसह या क्रिकेटर्संच्या कामगिरीचा आलेखही उंचावल्याचा रेकॉर्ड

लग्नानंतर क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीत कमालीची सुधारणा झालेल्या परदेशी क्रिकेटर्समध्ये डेविड वॉर्नरसह एबी डिव्हिलियर्स शेन वॉटसन आणि हाशिम अमला या दिग्गजांचा समावेश आहे. डेविड वॉर्नरन सलामीवीराच्या रुपात खास छाप सोडताना ५० पेक्षा अधिकच्या सारासरीने धावा काढल्या. मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असणाऱ्या एबीची लग्ना आधीची  वनडेतील सरासरी ४७ च्या खरात होती. जी लग्नानंतर ६३ च्या घरात पोहचली. शेन वॉटसन वनडेत ३५ च्या सरासरीवरून ४५ च्या घरात पोहचला तर हाशिम अमला याने लग्नानंतर कसोटीत ४६ च्या सरासरीवरून ५३ पेक्षा अधिकच्या सरासरीनं धावे केल्याचे पाहायला मिळाले.   

अर्जुन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीत ट्विस्ट येणार का?

लग्नानंतर क्रिकेटच्या मैदानातील कामगिरी उंचावणारे क्रिकेटर अन् लग्नाची पहिली पायरी चढलेला अर्जुन तेंडुलकर यांच्यात एक मोठं अंतर आहे ते म्हणजे ज्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली त्यांनी लग्नाआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री मारली होती. दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर याने अजून तिथपर्यंतही मजल मारलेली नाही. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्यावर बोली लावली. सातत्यपूर्ण खेळण्याची संधी काही त्याला मिळाली नाही.  त्याच्याकडे अजूनही वेळ आहे. इथं धमक दाखवून येत्या काळात छाप सोडणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

 

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरऑफ द फिल्डविराट कोहलीअनुष्का शर्मारोहित शर्माअजिंक्य रहाणेडेव्हिड वॉर्नरएबी डिव्हिलियर्स