Arjun Tendulkar Mumbai Indians : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अनेकदा चर्चेत असतो. अर्जुन त्याच्या वडिलांमुळे नेहमीच चर्चेत येतो, पण क्रिकेटपटू म्हणून त्याला अद्याप म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाने गेल्या अनेक हंगामात अर्जुनला संघात सामील करून घेतले. पण त्याला अपेक्षित संधीच मिळाली नाही. त्यामुळे अलिकडेच मुंबई इंडियन्सने त्याला लखनौ सुपर जायंट्सला स्वाधीन केले. MI कडून अर्जुनला फक्त ५ सामने खेळता आले. तसेच, रणजी स्पर्धेतही अर्जुनला मुंबई संघातून अपेक्षित संधी न मिळाल्याने, तो गोवा संघाकडून खेळू लागला. तशातच आता अर्जुन तेंडुलकरने आता एक मोठी कामगिरी केली आहे.
अर्जुन तेंडुलकरचे अनोखे शतक
अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. तो गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने वरिष्ठ क्रिकेट मोठा टप्पा गाठला. अर्जुनने हार्विक देसाईची विकेट घेऊन त्याच्या कारकिर्दीतील १००वा बळी टिपला. अर्जुनने २०२१ मध्ये मुंबईकडून हरयाणाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात वरिष्ठ क्रिकेटमधील पहिला बळी घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४८, लिस्ट ए क्रिकेटमध्ये २५ आणि टी२० मध्ये २७ बळी घेतले.
![]()
अर्जुनची अडखळती क्रिकेट कारकीर्द
अर्जुन २०२२-२०२३च्या स्थानिक हंगामापूर्वी मुंबईत संधींचा अभाव असल्याने गोव्यात गेला होता. २०२२ मध्ये त्याने राजस्थानविरुद्ध गोव्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. त्याच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात अर्जुनने शतक ठोकले होते. २६ वर्षीय अर्जुनला खेळाडूला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले. त्यानंतर त्याने २०२३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुनला २०२३ मध्ये ४ आणि २०२४ मध्ये फक्त १ सामना खेळायला मिळाला. आयपीएलमध्ये त्याच्या नावे केवळ ३ विकेट्स आहेत. त्यानंतर यंदा तो लखनौच्या संघात सामील झाला.