Join us

टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली

‘सरोगेट’ ब्रँड, गेमिंग, क्रिप्टो करन्सीसंबंधी कंपन्यांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 07:09 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजकत्व हक्कांसाठी बोली आमंत्रित केल्या आहे. यामध्ये वास्तविक पैसे वापरून होणाऱ्या गेमिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना बंदी घालण्यात आली आहे. कारण सरकारने अशा कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

बीसीसीआयने बोली जमा करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर निश्चित केली आहे. त्यामुळे भारतीय संघ ९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेमध्ये मुख्य प्रायोजकाविना खेळेल. बीसीसीआयच्या एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, ‘बोली लावणारा, ज्यामध्ये त्याच्या गटातील कोणतीही कंपनी समाविष्ट आहे, त्याने भारतात किंवा जगात कुठेही ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगार किंवा तत्सम सेवा करू नये. भारतातील कोणत्याही व्यक्तीस ऑनलाइन मनी गेमिंग, सट्टेबाजी किंवा जुगार किंवा तत्सम सेवा पुरवू नये आणि भारतात सट्टेबाजी किंवा जुगार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमध्ये गुंतवणूक किंवा मालकी हक्क ठेवू नये.’ आयईओआय खरेदी करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर आणि बोलीचे दस्तऐवज जमा करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर आहे.

बीसीसीआयने असेही म्हटले आहे की, ‘बोली लावणारा किंवा त्याच्या गटातील कोणतीही कंपनी अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात किंवा क्रियाकलापात सामील नसावी ज्यास ऑनलाइन गेमिंग अधिनियम २०२५ अंतर्गत परवानगी नाही.’ याशिवाय तंबाखू, दारू आणि सार्वजनिक नैतिकतेला ठेच पोहोचविणाऱ्या कोणत्याही गोष्टी पात्र राहणार नाहीत.

बोर्डाने हेही स्पष्ट केले की, काही ब्रँड श्रेणींना ‘ब्लॉक’ केले जाईल. कारण, बीसीसीआयकडे त्या श्रेणींमध्ये आधीच प्रायोजक आहेत. यामध्ये ॲथलेजर आणि क्रीडावस्त्र उत्पादक, बँक, बँकिंग व वित्तीय सेवा व बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या, अल्कोहलविरहित शीतपेय, पंखे, मिक्सर ग्राइंडर, सुरक्षा कुलपे व विमा यांचा समावेश आहे.  बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘एखादा बोलीदार एकापेक्षा अधिक ब्रँड/उत्पादन श्रेणींमध्ये काम करत असेल आणि त्यापैकी एखादी श्रेणी निषिद्ध किंवा ब्लॉक श्रेणीत असेल तर अशा श्रेणींशी संबंधित बोली सादर करण्यास परवानगी दिली जाणार नाही.’

सरोगेट बोलीला बंदी

बोली लावणाऱ्यांना ‘सरोगेट’ ब्रँडच्या माध्यमातून बोली लावण्यास मनाई करण्यात आली आहे. सरोगेट ब्रँडिंग म्हणजे, एखाद्या अन्य संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या वतीने अप्रत्यक्षपणे बोली सादर करण्याचा केलेला कोणताही प्रयत्न. यामध्ये वेगवेगळ्या नावांचा, ब्रँड्सचा, ओळख किंवा लोगोचा वापर समाविष्ट आहे, पण तेवढ्यापुरते मर्यादित नाही. बोली लावणाऱ्याची वित्तीय पात्रता अशी आहे की, मागील तीन वर्षांचा त्यांचा सरासरी टर्नओव्हर किमान ३०० कोटी रुपये असावा किंवा मागील तीन वर्षांची सरासरी निव्वळ मालमत्ता किमान ३०० कोटी रुपये असावी. बीसीसीआयने म्हटले आहे की, ते कोणतेही कारण न देता कोणत्याही स्तरावर आयईओआय प्रक्रिया रद्द किंवा बदल करण्याचा अधिकार राखून ठेवतात.

टॅग्स :ऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय