Join us  

दोघात तिसरा; संघातील चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूचं धोनी, रायुडूला आव्हान

वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ जवळपास निश्चित मानला जात असला तरी माजी खेळाडू अनेक पर्याय सुचवत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 9:30 AM

Open in App

चेन्नई : वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ कोणत्या खेळाडूंसह जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर उतरतील, या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी देणं अवघड आहे. वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ जवळपास निश्चित मानला जात असला तरी माजी खेळाडू अनेक पर्याय सुचवत आहेत. भारतीय संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू लक्ष्मीपती बालाजीने वर्ल्ड कप संघासाठी एका खेळाडूचा पर्याय सूचवला आहे. भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू यांच्यात स्पर्धा सुरू आहे, परंतु बालाजीने सुचवलेला एक खेळाडू चौथ्या क्रमांकाच्या शर्यतीत उतरणारा आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी धोनी व रायुडूसमोर या खेळाडूचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

( भारताचा वर्ल्ड कपसाठीचा संघ भज्जीनं केला जाहीर, जाणून घ्या टॉप 15!

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत समाधानकारक कामगिरी करणाऱ्या विजय शंकरचा भारताच्या वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात यावा असे मत बालाजीनं व्यक्त केलं आहे. तो चौथ्या क्रमाकांसाठी योग्य खेळाडू असल्याचेही बालीजी म्हणाला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेत हार्दिक पांड्याला बदली खेळाडू म्हणून शंकरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्याला या दोन्ही दौऱ्यात विकेट घेता आली नाही, परंतु त्याने फलंदाजीत आपली छाप सोडली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत त्याने 45 धावा केल्या आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांत त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 84 धावा केल्या.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघाचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही वर्ल्ड कप संघासाठी शंकरच्या नावाचा विचार केला जाईल, असे संकेत दिले. त्यामुळे अंतिम संघ निवडताना त्यांचीच डोकेदुखी वाढणार आहे. बालाजी म्हणाला,'' भारताच्या वर्ल्ड कप संघात विजय शंकर नक्की हवा. त्याने फलंदाजीतून स्वतःला सिद्ध केले आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात दमदार कामगिरी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे त्याचा राखीव खेळाडू म्हणून तरी संघात समावेश करावा. तो कदाचित अंतिम अकरात फिट बसत नसेलही, परंतु तुम्हाला एक मजबूत फळी पाहिजे.'' 

चौथ्या क्रमांकासाठी तो उत्तम पर्याय ठरू शकतो. बालाजी म्हणाला,''त्याने फलंदाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकासाठी सक्षम पर्यायाच्या नेहमी शोधात आहे. शंकरचा वर्ल्ड कप संघात समावेश झाल्यास तो या क्रमांकासाठी पर्याय ठरू शकतो. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार नक्की व्हायला हवा.'' 

टॅग्स :आयसीसी विश्वकप २०१९आयसीसीमहेंद्रसिंह धोनीअंबाती रायुडूबीसीसीआय