Join us  

"कपिल देवनं माझं ऐकलं आणि निवृत्तीची घोषणा केली", अंशुमन गायकवाड यांनी सांगितला जुना किस्सा 

मी सांगितल्यावर कपिल देवने पुढच्या सामन्यातून निवृत्ती जाहीर केल्याचे अंशुमन गायकवाड यांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 7:08 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाचे माजी खेळाडू जेव्हा एका मोठ्या व्यासपीठावर जमतात तेव्हा क्रिकेट वर्तुळात अनेक चर्चा रंगत असतात. अनेक माजी खेळाडू क्रिकेटच्या मैदानापासून ते ड्रेसिंग रूमपर्यंतचे भन्नाट किस्से सांगून चाहत्यांचे मनोरंजन करतात. तर काही खेळाडू जुन्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना ताज्या बनवतात. असाच एक खुलासा माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी केला आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी माझ्या विनंतीला मान देऊन एका महान खेळाडूप्रमाणे ऐकून निवृत्तीची घोषणा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय संघाचे माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी क्रिकेटबाबत काही खुलासे केले आहेत. मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. १९९७ साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले. पण ती फायनल आपण जिंकलो. असं असलं तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे माझे ठाम मत आहे. पण स्पॉट फिक्सिंग तसेच वैयक्तिक फिक्सिंग नक्कीच होते, असे देखील त्यांनी म्हटले. 

 कपिलला थांब सांगणं कठीण होतंभारताचा सर्वात यशस्वी खेळाडू कपिल देवला त्याच्या निवृत्तीबाबत सांगणं आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. तेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदविल्यानंतर कपिलने निवृत्ती जाहीर करावी, असे सर्वांचे मत होते, पण पामानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कपिलने आणखी दोन वर्ष खेळणार असल्याचे जाहीर करताच आमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कपिलने आता थांबायला हवं, असे सर्वाना वाटत होते, पण त्याला हे सांगणार कोण? ही जबाबदारी सर्वांनी माझ्याच खांद्यावर टाकली. पण कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले आणि सन्मानाने पुढच्याच सामन्यात निवृत्ती जाहीर केली, अशी आठवण अंशुमन गायकवाड यांनी सांगितली.

अंशुमन गायकवाड यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा गट्स आणि ग्लोरी कार्यक्रमात अंशुमन गायकवाड यांनी आपल्या लौकिकाला साजेशी जिगरबाज फलंदाजी केली. मी क्रिकेटपटू नसतानाही मी कसा घडलो, याचे सभागृहात हसे पिकवणारे भन्नाट किस्से गायकवाड यांनी सांगितले. शाळेत अभ्यास ढ असल्यामुळे बाबांनी क्रिकेट खेळायला सांगितले, पण फलंदाजी करताना फार भीती वाटायची. माझा खेळ पाहून बाबांनी मला पुन्हा शिक्षणाकडे लक्ष द्यायला सांगितले. पण मी बाबांचे ऐकले नाही. शाळेत मी फारच घडलो नाही, पण विद्यापीठात मला खूप शिकायला मिळालं, माझं खरं क्रिकेट इथेच बहरलं. भारतीय संघात निवड झाल्यावर विंडीजविरूद्धच पदार्पण होते. भारतातली ती मालिका आपण जिंकलो. पण वेस्ट इंडीजच्या वेगवान तोफखान्यासमोर उभं राहणंच कठिण असताना, खेळणं आणखी कठिण असायचं. विंडीजसमोर आपण धीराने खेळायचो, म्हणून आपल्याला सलामीला बढती दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला आणि रॉबर्टस्-होल्डिंगसमोर अवघा भारतीय संघ जायबंदी होत असताना आपण लढविलेला किलल आणि त्यानंतर आपली थेट आयसीयूमध्ये बुक झालेली खाट ही थरारक आठवणही ते सांगायला विसरले नाहीत.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकपिल देवसचिन तेंडुलकरमॅच फिक्सिंग
Open in App