Join us

"माझ्या बायकोला ती मस्करी वाटली"; कुंबळेने सांगितला २१ वर्षांपूर्वीचा मजेशीर किस्सा

वेस्ट इंडिज विरूद्ध कुंबळे तुटलेल्या जबड्याने खेळला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:12 IST

Open in App

Anil Kumble Wife, IND vs WI: भारताचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबळेची गणना जगातील दिग्गज फिरकीपटूंमध्ये केली जाते. भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. कुंबळेने आता 2002 चा एक जुना किस्सा सांगितला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या एका मजेशीर गोष्टीबद्दल सांगितले.

दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने 2002 च्या अँटिग्वा कसोटीत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध तुटलेल्या जबड्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याची पत्नी चेतना हिला वाटले की तो मस्करी करत आहे. त्यावेळी कॅरेबियन संघात ब्रायन लारासारखे फलंदाज होते. कुंबळे त्यांना सर्वात कठीण प्रतिस्पर्धी मानायचा. कुंबळे म्हणाला की, लारासारख्या क्रिकेटरकडे एका चेंडूसाठी तीन शॉट्स होते. तो कसा ही खेळू शकत असे. असं असतानाही कुंबळेने असा धाडसी निर्णय घेतला आणि तुटलेल्या जबड्याने सलग 14 षटके टाकली. एवढेच नाही तर लारालाही बाद केले.

बायकोला विनोद वाटला

कुंबळेने एका मुलाखतीत सांगितले की, 'मी माझ्या पत्नी चेतनाला सांगितले की मला शस्त्रक्रियेसाठी भारतात परतावे लागेल. बंगळुरूमध्ये त्यांनी सर्व व्यवस्था केली आहे. फोन ठेवण्यापूर्वी मी तिला सांगितले की मी बॉलिंग करणार आहे. त्यांना वाटलं मी मस्करी करतोय. माझ्या पत्नीने ते गांभीर्याने घेतले असे मला वाटत नाही. तो म्हणाला की, त्याचा जबडा तुटला असला तरी संघासाठी काही विकेट घेण्याची जबाबदारी त्याला वाटत होती. जेव्हा तो ड्रेसिंग रुममध्ये गेला तेव्हा सचिनला गोलंदाजी करताना दिसला कारण संघात तो एकमेव लेग स्पिनर गोलंदाज होता. त्यावेळी वेव्हल हिंड्स क्रीजवर होता. म्हणून त्याने तसा निर्णय घेतला होता.

कुंबळे म्हणाला, 'मला वाटले की हीच माझी संधी आहे, मला जाऊन विकेट घ्यावी लागेल. जर आम्हाला वेस्ट इंडिजच्या 3-4 विकेट मिळाल्या तर आम्ही सामना जिंकू शकतो. मी अँड्र्यू लीपसला सांगितले की मला खेळायला जायचे आहे. कुंबळे दुसऱ्या दिवशी बंगळुरूला परतणार होता. त्या वेळी कुंबळे म्हणाला, 'किमान मी माझ्या परीने प्रयत्न केला, या विचाराने घरी जाईन.'

सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कुंबळेला मर्विन डिलनचा फटका बसला, परंतु रक्तस्त्राव होऊनही त्याने आणखी 20 मिनिटे फलंदाजी केली. हा सामना अनिर्णित राहिला ज्यामध्ये दोन्ही संघांनी पहिल्या डावात 500 हून अधिक धावा केल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजअनिल कुंबळेभारतीय क्रिकेट संघ
Open in App