Join us  

आंद्रे रसेलचे वेस्ट इंडिज संघात पुनरागमन; द. आफ्रिका, पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाची धुलाई करणार

ऑलराऊंडर आंद्र रसेल ( Andre Russell) याचे वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात मार्च २०२०नंतर पुनरागमन झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 1:59 PM

Open in App

ऑलराऊंडर आंद्र रसेल ( Andre Russell) याचे वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात मार्च २०२०नंतर पुनरागमन झालं आहे. वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी १८ सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात शिमरोन हेटमायर व शेल्डन कोट्रेल यांचेही पुनरागमन झाले आहे आणि किरॉन पोलार्ड हा या संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. सुनील नरीन याला मात्र संघाबाहेरच राहणार आहे. सध्यातरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यास तयार नसल्याचे त्यानं निवड समितीला कळवले आहे. ''त्याचा निर्णय बदलला, तर निवड समिती त्याच्या नावाचा विचार करेल,''असे क्रिकेट वेस्ट इंडिजच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

 श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवलेल्या संघातील बऱ्याच खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे. कोट्रेल, ओशाने थॉमस व हेडन वॉल्श ज्युनियर हेही संघात परतले आहेत. ३९ वर्षीय जलदगती गोलंदाज फिडेल एडवर्ड्स यानेही आपले स्थान कायम राखले आहे. ख्रिस गेल व एव्हिन लुईस हेही या संघाचे सदस्य आहेत, तर निकोलस पूरनकडे उपकर्णधारपद असणार आहे.

''दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी हे संभाव्य खेळाडू निवडण्यात आले आहेत. या खेळाडूंमधून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ तयार करण्यात मदत मिळणार आहे,''असे क्रिकेट वेस्ट इंडिजनं सांगितले. पुढील १८ महिन्यांत दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहेत आणि त्यासाठी तगडा १५ सदस्यीय संघ निवडणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनं या मालिकाही महत्त्वाच्या आहेत.  

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २६ जून ते ३ जुलै या कालावधीत होणार आहे. आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच ट्वेंटी-२० व पाकिस्तानविरुद्ध पाच ट्वेंटी-२० सामने होतील. वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-२० संघ - किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, फॅबियन अॅलेन ,ड्वेन ब्राव्हो, शेल्डन कोट्रेल, फिडेल एडवर्ड्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसैन, एव्हिन लुईस, ऑबेड मॅकॉय, आंद्र रसेल, लेंडल सिमन्स, ओशाने थॉमस, हेडन वॉल्श ज्यु.   

टॅग्स :वेस्ट इंडिजद. आफ्रिकाआॅस्ट्रेलियापाकिस्तानटी-20 क्रिकेट