भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार हनुमा विहारी ( Hanuma Vihari) याच्या इस्टा पोस्टने आज खळबळ माजवली. रणजी करंडक स्पर्धेदरम्यान संघाचे नेतृत्व करताना तो काही कारणामुळे एका खेळाडूवर ओरडला. तो खेळाडू राजकीय नेत्याचा मुलगा निघाला आणि त्याने विहारीची तक्रार राज्य संघटनेकडून त्याचा राजीमाना घेण्यास सांगितले. आज रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर हनुमा विहारीने ही घटना सांगून संताप व्यक केला. 
हनुमा विहारीने इंस्टा पोस्ट लिहिली की, ही पोस्ट मी पुढे मांडू इच्छित असलेल्या काही तथ्यांबद्दल आहे. बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी १७व्या खेळाडूला ओरडले आणि त्याने त्याच्या वडिलांकडे ( जे एक राजकारणी आहेत) तक्रार केली, त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले. मी ठरवले आहे की मी आंध्रसाठी कधीही खेळणार नाही जिथे,  मी माझा स्वाभिमान गमावला आहे. 
हनुमा विहारीने संपूर्ण पोस्टमध्ये तो खेळाडू कोण हे सांगितले नाही. पण, 
आंध्र प्रदेशचा यष्टीरक्षक कुंत्रापकम नरसिंम्हा पृध्विराज ( Andhra wicketkeeper Kuntrapakam Narsimha Prudhviraj ) याने इंस्टा स्टोरीवरून दिलेल्या उत्तरावरून याचे उत्तर मिळाले. अभिनेता व राजकारणी बळीरेड्डी पृध्विराज यांचा तो मुलगा आहे. त्यांनी १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि  फेब्रुवारी २०१९  मध्ये, त्यांची आंध्र प्रदेशच्या YSR काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 
कुंत्रापकम याने लिहिले की, तुम्ही ज्या खेळाडूला शोधत आहात, तो मीच आहे. तुम्ही जे काही ऐकलं आहे, ते चुकीचं आहे. खेळापेक्षा कुणीच मोठा नाही आणि माझ्यासाठी आदर हा अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी गोष्ट आहे. वैयक्तिक टीका आणि शिवीगाळ कोणीच ऐकून घेणार नाही. त्यादिवशी काय घडलं हे संघातील प्रत्येकाला माहीत आहे.