मुंबई : जगाला सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज देणारे गुरु रमाकांत आचरेकर सर यांचे बुधवारी 87 व्या वर्षी निधन झाले. तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडू घडवणारे आचरेकरसर बऱ्याच काळापासून आजारीच होते. तेंडुलकरच्या कारकिर्दीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आंतरराष्ट्रीय त्यांची ओळख ही तेंडुलकरचे गुरु अशीच होती. नुकतेच तेंडुलकर आणि कांबळी यांनी आचरेकर सरांचा आशीर्वाद घेत नव्या इनिंग्जची सुरुवात केली होती. तेंडुलकर आणि आचरेकर सर यांची ती भेट अखेरची ठरली.
शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर क्रिकेट संघाकडून सचिन खेळायचा. यावेळी सचिनला प्रशिक्षण देणाऱ्या आचरेकर सरांनी त्याच्यासाठी खास एका सराव सामन्याचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी सचिनचा सिनिअर संघ वानखेडे मैदानावर हॅरिस शिल्डचा सामना खेळत होता. लहानपणी खोडकर असलेला सचिन आचरेकर सरांचा आदेश धुडकावून सिनिअर संघाचा सामना बघायला गेला. त्यावेळी आचरेकर सरांनी भरलेला दम तेंडुलकरच्या कायम लक्षात राहिला. त्यामुळेच जगाला महान फलंदाज मिळाला.
तेंडुलकर आणि कांबळी यांनी नुकतेय एका क्रिकेट प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली आणि ती सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आचरेकर सरांचा आशीर्वाद घेतला होता. त्यांची ती भेट शेवटची ठरली.