Join us  

आता बीसीसीआयमध्येही अमित शहा यांची सत्ता; मुलाची झाली धडाक्यात एंट्री

बीसीसीआयमध्ये अमित शहा यांचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 5:07 PM

Open in App

मुंबई : देशामध्ये भाजपाला सत्ता मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलणारे विद्यमान गृहमंत्री अमित शहा आता क्रिकेटच्या व्यासपीठावरही आपली रणनीती आखताना दिसतील. कारण अमित शहा यांची आता बीसीसीआयमध्येही सत्ता असणार आहे. त्यांचा मुलगा जय शहाने बीसीसीआयमध्ये धडाक्यात एंट्री केली असून आता बीसीसीआयमध्ये शहा यांचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 23 ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी औपचारीकपणे जय यांना बीसीसीआयचे सचिवपद देण्यात येणार आहे. पण आज झालेल्या बीसीसीआयच्या महत्वाच्या बैठकीमध्ये जय यांचे सचिवपदी शिक्कामोर्तब झाले आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे असणार आहे. पण प्रत्येक संघटनेमध्ये अध्यक्षापेक्षा जास्त वजन सचिवाचे असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता बीसीसीआयचे सचिवपद सांभाळल्यावर जय शहा कोणते निर्णय घेतात, याची उत्सुकता सर्वांना असेल.

काही वर्षांपूर्वी अमित शहा हे गुजरात क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावर होते. बीसीसीआयमध्ये आपणही अध्यक्षपद भूषवावे, अशी त्यांचीही मनीषा होती. पण त्यांना काही कारणास्तव ही गोष्ट करता आली नाही. पण त्यांनी आपले हे स्वप्न मुलामध्ये पाहिले आणि त्याची आता बीसीसीआयमध्ये झोकात एंट्री झाली आहे. सध्याच्या घडीला जय शहा हे गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले. 

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.

टॅग्स :अमित शहाबीसीसीआयसौरभ गांगुली