दुबई : प्रेरणा व मार्गदर्शन घेण्यासाठी फलंदाज अंबाती रायुडूची नजर महेंद्रसिंह धोनीवर केंद्रित झाली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रायुडू आशिया कप स्पर्धेसाठी तयारी करीत आहे. भारतीय संघ कोहलीविना यूएईमध्ये दाखल झाला आहे. कोहलीला व्यस्त कार्यक्रमामुळे निवड समितीने विश्रांती दिली आहे.
रायुडू म्हणाला, ‘विराटची उणीव भासेल. त्याची अनुपस्थिती म्हणजे संघाचे नुकसान आहे. तरी भारतीय संघ दर्जेदार खेळाडू असल्यामुळे विजय मिळवण्यास सक्षम आहे. धोनीने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले असून तो संघातील प्रत्येक सदस्याची मदत करतो. मला यंदाच्या मोसमात सावरण्यासाठी धोनीने बरीच मदत केली.’
विश्वकप स्पर्धेला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असून मधली फळी अद्याप निश्चित नाही. त्यामुळे रायुडूसारख्या खेळाडूला संघातील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी आहे. रायुडू म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी अद्याप याबाबत विचार केलेला नाही आणि याकडे स्पर्धा म्हणूनही बघत नाही. ही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे आणि याचा विचार करीत आपल्यावरील दडपण वाढविणार नाही.’
दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन करीत असलेला ३२ वर्षीय रायडू म्हणाला, ‘माझ्या मते कुणी विश्वकप स्पर्धेबाबत विचार करीत असेल, असे मला वाटत नाही. आम्ही आशिया कप स्पर्धेसाठी येथे दाखल झालो आहोत.’
भारताला स्पर्धेतील आपला पहिला सामना १८ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध खेळायचा आहे तर त्यानंतरच्या दिवशी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढत होईल. 
दुसऱ्या प्रयत्नात यो-यो चाचणी यशस्वी केल्यानंतर रायुडूला भारत ‘अ’ संघाच्या तिरंगी मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. त्यात अन्य संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ यांचा समावेश होता. या स्पर्धेत रायुडूची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने बंगळुरूमध्ये आॅस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध कमी धावसंख्येच्या लढतीत नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली होती. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध अलूरमध्ये त्याने ६६ धावांची खेळी केली होती.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सतर्फे चमकदार कामगिरी केल्यानंतरही इंग्लंड दौºयासाठी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी निवड न होणे निराशाजनक होते, असेही रायुडूने सांगितले. रायुडू पहिल्या प्रयत्नात यो-यो चाचणीत अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते.
सलग दोन लढतींमुळे काही नुकसान होईल, असे वाटत नाही. पहिल्या लढतीचा थकवा विसरून दुसºया लढतीसाठी सज्ज होण्याचा प्रयत्न राहील.
- अंबाती रायुडू