Join us  

Ambati Rayudu Retirement: रायुडूच्या निवृत्तीला निवड समिती जबाबदार, गंभीरने डागली तोफ

पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या एकट्या रायुडूच्या नावावर आहेत, असे गंभीरने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 8:02 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बुधवारी जाहीर केला. रायुडूच्या निवृत्तीनंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने निवड समितीवर थेट तोफ डागली आहे. रायुडूच्या निवृत्तीला निवड समितीच जबाबदार असल्याचे विधान गंभीरने केले आहे.

हा निर्णय जाहीर करत असताना रायुडूने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये रायुडूने काही खेळाडूंची नावे घेतली आहेत. विश्वचषकात भारतीय संघ अजून चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या प्रतिक्षेत आहेत. या स्थानावर रायुडूला स्थान मिळायला हवे, असे साऱ्यांनाच वाटत होते. विश्वचषकाचा संघ निवडण्यात आला. त्यावेळी रायुडूचे संघात नाव नव्हते. त्यामुळे बऱ्याच जणांनी निवड समितीवर टीका केली होती.

आता रायुडूच्या निवृत्तीनंतर गंभीरने निवड समितीला चांगलेच धारेवर धरले आहे. गंभीर म्हणाला की, " विश्वचषकात निवड समितीने निराश केले आहे. रायुडूच्या निवृत्तीलाही निवड समितीच जबाबदार आहे."

यापुढे गंभीर म्हणाला की, " निवड समितीमध्ये सध्या पाच सदस्य आहेत. पण या पाच सदस्यांनी मिळून जेवढ्या धावा केल्या नाहीत तेवढ्या एकट्या रायुडूच्या नावावर आहेत. विश्वचषकात शिखर धवन आणि विजय शंकर यांना दुखापत झाली. त्यांच्याजागी रिषभ पंत आणि मयांक अगरवाल यांची निवड करण्यात आली. पण निवड समितीने यावेळी रायुडूच्या नावाचा विचारही केला नाही. ही दुर्देवी गोष्ट आहे."

आता आपल्याला भारतीय संघात स्थान मिळणार नाही. निवड समिती आपल्यावर राग काढणार आणि यापुढेही आपल्याला संघातून बाहेर काढणार, असे रायुडूला वाटले. रायुडूचा हा विचार, पूर्णपणे चुकीचा आहे, असे कुणीही म्हणणार नाही. त्यामुळेच रायुडूने अखेर अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला.

गंभारने सांगितले की, " जो खेळाडू आयपीएल आणि देशासाठी चांगली कामगिरी करतो. शतके आणि अर्धशतके झळकावतो. त्याचबरोबर तो पूर्णपणे फिट असतो, अशा खेळाडूला निवृत्ती घ्यावी लागणे, हे फारच वाईट आहे. भारतीय क्रिकेटसाठी ही निराशादायी घटना आहे."

टॅग्स :अंबाती रायुडूगौतम गंभीर