Join us  

निवृत्तीच्या निर्णयावरून यू टर्न घेणाऱ्या अंबाती रायुडूकडे थेट कर्णधारपदाची जबाबदारी

दोन महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायुडूला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे वेध लागले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 1:54 PM

Open in App

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या अंबाती रायुडूला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे वेध लागले आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला त्यानं पत्र पाठवले आणि त्यात त्यानं निवृत्तीचा निर्णय भावनेच्या भरात घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्याची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. आगामी विजय हजारे चषक वन डे क्रिकेट स्पर्धेसाठीच्या हैदराबाद संघाचे नेतृत्व रायुडूच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे.

मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी नोव्हेंबर 2018मध्ये रायुडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटला रामराम केला होता. त्यानंतर रायुडूनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 217 धावा केल्या. त्यात मुंबईतील मॅच विनिंग शतकी खेळीही होती. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही त्यानं ( 190) सर्वाधिक धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर वर्ल्ड कप पूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत त्याला अपयश आले आणि तो वर्ल्ड कप संघातूनच बाहेर पडला.  वर्ल्ड कप स्पर्धेत शिखर धवन व विजय शंकर दुखापतीमुळे माघारी फिरूनही रायुडूच्या नावावर काट मारत बीसीसीआयनं रिषभ पंत व मयांक अग्रवाल यांना लंडनला पाठवले होते. त्यामुळे रायुडू नाराज होता. त्यानं शंकरच्या निवडीनंतर ती नाराजी सोशल मीडियावर व्यक्तही केली होती आणि त्यानंतर त्यानं निवृत्तीचा निर्णय घेतला होता. अनेक वर्ष मधल्या फळीसाठी रायुडूला संधी दिली गेली, परंतु त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळेच वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याची निवड केली गेली नाही. त्यामुळे नाराज होत त्यानं निवृत्ती जाहीर केली. पण, मागील महिन्यात त्यानं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला, ''मी निवृत्तीचा निर्णय मागे घेत आहे आणि सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे. हैदराबाद संघासोबत पुढील मोसमात खेळण्याची इच्छा आहे आणि मी सर्व कौशल्य पणाला लावून संघासाठी योगदान देईन. मी 10 सप्टेंबरपासून हैदराबाद संघासाठी उपलब्ध आहे.'' 

रायुडूनं भारताकडून 6 ट्वेंटी-20 सामन्यांत 42 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 97 सामन्यांत 45.56 च्या सरासरीनं 6151 धावा कुटल्या आहेत आणि त्यात 16 शतकं व 34 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 160 सामन्यांत 5103 धावा केल्या, तर सर्व प्रकारच्या 216 ट्वेंटी-20 लढतीत 4584 धावा चोपल्या आहेत. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. त्याची ही विनंती मान्य झाली.  33 वर्षीय रायुडूनं  55 वन डे सामन्यांत 1694 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. 

हैदराबाद संघ - अंबाती रायुडू ( कर्णधार), बी संदीप, पी अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकूर तिलक वर्मा, रोहित रायुडू, सीव्ही मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मायकल जैस्वाल, जे मल्लिकार्जुन ( यष्टिरक्षक), कार्तिकेया काक, टी रवी तेजा व अजय देव गौड.  

टॅग्स :अंबाती रायुडूहैदराबादवर्ल्ड कप 2019