Join us

अहो आश्चर्यम! चेंडू स्टंपला लागला, मधून निघून गेला पण बेल्स पडल्याच नाहीत; सारेच हैराण (Video)

क्रिकेटच्या मैदानात असे थक्क करणारे प्रसंग बरेचदा घडत असतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:58 IST

Open in App

Funny Cricket Videos: जर एखाद्या फलंदाजाला बाद करायचा असेल तर त्याचा त्रिफळा उडवणे हे निर्विवाद यश मानले जाते. नियम सांगतो की चेंडू स्टंपवर आदळताच बेल्स देखील पडतात आणि खेळाडू बाद होतो. पण महत्त्वाचा भाग हाच आहे की, केवळ चेंडू स्टंपला लागून चालत नाही तर स्टंपवरील बेल्सदेखील पडायला हव्यात. तसे न झाल्यास फलंदाज नाबाद राहतो. चेंडू स्टंपला आदळल्यानंतरही बेल्स पडत नाही असा प्रकार फारच विरळा असतो. पण तरीही क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा विचित्र प्रकार घडल्याचे दिसून येतेच. सध्याही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चेंडू स्टंपच्या मधून जातो, पण बेल्स हलत नाही. हे दृश्य पाहून सारेच अवाक् होत आहेत.

कुठे घडला किस्सा? पाहा भन्नाट व्हिडीओ

सुरतमध्ये टेनिस बॉल स्पर्धेदरम्यान, चेंडू स्टंपच्या मधून गेला, परंतु बेल्स जागेवरून हलली नाही, पडलीही नाही. बॅट्समनने फास्ट बॉलरचा चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला आणि चेंडू स्टंपच्या मधून गेला. हे दृश्य पाहून फलंदाजाला आपल्या नशीबावर विश्वास बसेना. गोलंदाजही घडलेला प्रकार पाहून फारच हताश झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यूजर्स मजेशीर कमेंटही करत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असे घडले आहे

व्हायरल होत असलेला व्हिडिओ टेनिस बॉल स्पर्धेचा आहे, पण एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असाच प्रकार घडला होता, जेव्हा फलंदाजापासून गोलंदाजापर्यंत सर्वजण अचंबित झाले होते. व्हायरल व्हिडीओसोबत एका यूजरने १९९७ मध्ये झालेल्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाकिस्तानचा गोलंदाज मुश्ताक अहमदचा चेंडू स्टंपमधून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण बेल्स जमिनीवर पडली नसल्याचे फलंदाज नाबाद राहिला आणि पुढे खेळू लागला.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया