लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र, या रद्द झालेल्या सामन्यातूनही भारतीय संघाने अनोखा विश्वविक्रम नोंदवला. कोणत्याही कारणामुळे रद्द झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान मिळवताना न्यूझीलंडला मागे टाकले. भारताचे आतापर्यंत ४२ एकदिवसीय सामने रद्द झाले असून न्यूझीलंडचे ४१ सामने रद्द झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे सर्वाधिक सामने रद्द झाले आहेत. भारताच्या रद्द झालेल्या सामन्यांमध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध १६२ एकदिवसीय सामने खेळले असून यापैकी ११ सामने रद्द झाले आहेत. २००२ साली भारत-श्रीलंका यांच्यामध्ये झालेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामनाही रद्द झाला होता.
दरवेळी पाऊसच व्हिलन नाही ठरला
सामने पावसामुळेच रद्द झाले असेही नाही. १९८९ मध्ये पाकविरुद्धचा सामना प्रेक्षकांच्या बेशिस्तीमुळेही रद्द केला. त्यावेळी ३ बळी झटपट बाद झाल्यानंतर पाक समर्थकांनी मैदानात दगडफेक केली. २००९ मध्ये भारत-श्रीलंका लढत खराब खेळपट्टीमुळे रद्द झाला होता. १९९७ साली इंदूर येथील भारत-श्रीलंका सामनाही खराब खेळपट्टीमुळे होऊ शकला नाही.
रद्द झालेले सामने
भारत : एकूण : १०१६, रद्द : ४२
न्यूझीलंड : एकूण : ७९०, रद्द : ४१
श्रीलंका : एकूण : ८७६, रद्द : ३८
ऑस्ट्रेलिया : एकूण : ९७५, रद्द : ३४
इंग्लंड : एकूण : ७७३, रद्द : ३०
वेस्ट इंडिज : एकूण : ८५२, रद्द : ३०
द. आफ्रिका : एकूण : ६४७ रद्द : २१
पाकिस्तान : एकूण : ९४५, रद्द : २०
झिम्बाब्वे : एकूण : ५५३, रद्द : १२
आयर्लंड : एकूण : १७९, रद्द : १०
बांगलादेश : एकूण : ४००, रद्द : ७
अफगाणिस्तान : एकूण : १३९ रद्द : ३