वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका आटोपल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. दरम्यान, या दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवल्याने ही निवड काहीशी धक्कादायक ठरली आहे. एकीकडे रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यासोबत निवड समितीने आणखीही काही धक्कादायक निर्णय घेतले असून, त्यामधून टीम इंडियातील दोन खेळाडूंची एकदिवसीय क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना स्थान देण्यात आलेले नाही. गेल्या काही काळामध्ये घटलेले एकदिवसीय सामन्यांचे प्रमाण आणि २०२७ च्या विश्वचषकासाठीची संघबांधणी विचारात घेता या दोन्ही खेळाडूंना एकदिवसीय संघामध्ये स्थान मिळणं कठीणच असल्याचे मानले जात आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळून निवड समितीने रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांच्या वनडे कारकिर्दीला जवळपास पूर्णविरामच दिल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान दिलं गेलं असलं तरी निवड समितीच्या २०२७ च्या विश्वचषकासाठीच्या संघबांधणीमध्ये हे दोघेही प्राधान्य क्रमावर असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे त्यांचीही एकदिवसीय क्रिकेटमधील कारकीर्द आता अखेरच्या टप्प्यात आल्याने मानले जात आहे. दरम्यान. ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये भारतीय संघ पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. तर दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा एकदिवसीय सामान २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.