लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीसाठी भाजप, उद्धवसेना आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांसह विविध पक्षांतील नेत्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे, ‘एमसीए’चे मावळते अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनीही पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे.
‘एमसीए’ निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे वानखेडे स्टेडियम परिसरातील ‘एमसीए’ कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. भारताच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. एडुल्जी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशा दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरला.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह उद्धवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व सूरज सामंत या विद्यमान एमसीए ॲपेक्स कौन्सिल सदस्यांसह मुंबई टी२० लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, ‘एमसीए’चे माजी संयुक्त सचिव शाहआलम शेख आणि क्रिकेट प्रशासक सुनील रामचंद्रन यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे.
विविध पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आल्याने ‘एमसीए’तील प्रमुख गटांमध्ये, विशेषतः राजकीय प्रभाव असलेल्या गटांमध्ये एकमताचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. या सर्व अर्जांची मंगळवारी छाननी होणार असून, ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज मागे येतील.
नाईक यांच्या अर्जाची चर्चा
‘एमसीए’चे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कारण, त्यांनी ॲपेक्स कौन्सिलमध्ये सलग सहा वर्षे पूर्ण केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या शिफारसींनुसार राज्य क्रिकेट संघटनांवर लागू केलेल्या ‘कूलिंग-ऑफ’ (सक्तीची रजा) कालावधीच्या अटींनुसार त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यांच्या अर्जाबाबतचा निर्णय निवडणूक अधिकारी घेतील.