जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सरकारने नवा आदेश जारी केला. पाकिस्तान क्रिकेट लीग पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांच्या आता पाकिस्तान सोडावे लागणार आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
भारतामध्ये आयपीएल खेळली जात आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही पीएसएल सुरू आहे, ज्यात पाकिस्तानसह अनेक देशातील खेळाडू क्रिकेट खेळत आहेत. या लीगमध्ये भारताचा कोणताही खेळाडू खेळत नाही. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तान प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन पाऊल उचलत आहे. पाकिस्तानच्या सरकारने नुकताच पीएसएलच्या संबंधित नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, पीएसएलच्या प्रसारण संघाचा भाग असलेल्या भारतीयांनी पुढील ४८ तासांच्या आत पाकिस्तान सोडावे लागणार आहे.
पहलगाम येथे झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही, यावर जोर दिला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२- २०१३ च्या हिवाळ्यात खेळली गेली. भारताने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला.