ललित झांबरे : महिलांची टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात खेळली जाणार आहे आणि त्याची तिकिटविक्री बरोब्बर एक वर्षआधी सुरू करण्यात आली आहे. त्याच्या प्रचारासाठी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलिसा हिली हिने सर्वाधिक उंचीवरुन आलेल्या चेंडूचा झेल घेण्याचा विक्रम मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर केला. तिच्या या विक्रमाची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने दखल घेऊन त्याला अधिकृत गिनीज विक्रमाची मान्यता दिली आहे.
अॅलिसाने तब्बल ८२.५ मीटर उंचीवरुन आलेला चेंडू यशस्वीरित्या झेलत हा विश्वविक्रम केला. हा विक्रम करताना तिने क्रिस्तान बौमगार्टनरचा २०१६ मधील ६२ मीटरचा विक्रम तब्बल २० मीटर उंचीच्या फरकाने मागे टाकला. बौमगार्टनरच्या आधी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनच्या नावावर होता. त्याने २०१६ मध्येच ४९ मीटर उंचीवरुन आलेला चेंडू झेलला होता.
आयसीसीची टी-२० प्लेयर ऑफ दी इयर असलेल्या अॅलिसाने एमसीजीवर गिनीज बूकचे अधिकृत निरिक्षक पीट फेयरब्रेन यांच्या देखरेखीत हा विक्रम केला. त्याची सुरुवात तिने ६५.२ मीटरसह केली.
एमसीजी मैदानावर क्रिकेटचा चेंडू घेऊन एक द्रोण एवढ्या उंचीवर स्थिरावले आणि त्याने तिथून सोडलेला तो चेंडू अॅलिसाने बरोबर झेलला. यानंतर अॅलिसाने आणखी उंचावरुन चेंडू झेलण्याची तयारी दर्शवली आणि ७२.३ मीटर उंचीवरुन आलेला चेंडू झेलण्यातही ती सफल ठरली. यामुळे आत्मविश्वास वाढल्यावर तिने ८० मीटरच्या वरचे लक्ष्य निश्चित केले पण हे लक्ष्य साध्य होणार नाही असेच वाटत होते. एकतर एवढ्या उंचीवरुन येताना चेंडूची गती वाढलेली होती आणि वाऱ्यांमुळे चेंडूचा येण्याचा मार्गही अधिक वक्राकार होत होता. त्यामुळे दोन वेळा झेल घेण्याचा प्रयत्न फसला. पहिल्यांदा चेंडू अॅलिसाच्या पुढ्यात पडला तर दुसऱ्यांदा ग्लोव्हजमध्ये येऊन हातातून निसटला.
त्यामुळे तिसरा आणि शेवटच्या प्रयत्नात अॅलिसाने झेल घेतला तरच या उंचीचा विक्रम नोंदला जाणार होता. तिला आणखी संधी मिळणार नव्हती आणि अशावेळी अॅलिसाने कोणतीही चूक केली नाही आणि ८२.५ मीटरच्या उंचीवरून आलेला चेंडू झेलण्याचा विश्वविक्रम तिच्या नावावर लागला.