Ajikya Rahane Shreyas Iyer viral video, IPL 2025 PBKS vs KKR: पंजाब किंग्ज संघाने छोट्या धावसंख्येचा बचाव करताना कोलकाता नाइट रायडर्स संघावर चित्तथरारक विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबची फलंदाजी ढेपाळली. प्रभसिमरन सिंग (३०), प्रियांश आर्य (२२) आणि शशांक सिंग (१८) यांच्या संघर्षपूर्ण खेळीच्या जोरावर पंजाबने १११ धावांचा पल्ला गाठला. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात उत्तम झाली. अंगक्रिश रघुवंशीने ३७ धावांची उत्तम खेळी केली. पण ३ बाद ७२ वरून कोलकाताचा डाव कोलमडला आणि ९५ धावांवर आटोपला. युजवेंद्र चहलने २८ धावांत ४ बळी घेत सामना फिरवला. या सामन्यानंतर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यात मराठमोळा संवाद रंगल्याचे दिसले.
अजिंक्य रहाणे-श्रेयस अय्यरमध्ये संवाद
कोलकाताच्या डावाची सुरुवात उत्तम झाली होती. ७२ धावांवर त्यांचे ३ गडी बाद झाले होते. कोलकाता हा सामना सहज जिंकेल अशी स्थिती होती. त्याच वेळी युजवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी फिरकीच्या जोरावर सामना फिरवला. चहलने अप्रतिम फिरकी गोलंदाजी करत ४ बळी घेतले. त्यातील काही बळी हे फलंदाजांच्या चुकीमुळे मिळाले. सामना संपल्यावर जेव्हा दोन संघ एकमेकांशी हस्तांदोलन करायला आले, तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि कर्णधार श्रेयस अय्यर समोरासमोर आले. त्यावेळी अजिंक्य रहाणे मराठीत म्हणाला, "काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..." या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, या विजयानंतर प्रीती झिंटाला झालेला आनंद बघण्याजोगा होता. स्टँडमध्ये बसलेली प्रीती झिंटा प्रत्येक विकेटनंतर उत्साहाने संघाला चीअर करताना दिसली. या ऐतिहासिक विजयानंतर प्रिती झिंटा मैदानात आली. मॅचचा हिरो ठरलेल्या चहलला ती भेटली. त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्या अन् गळाभेट घेत घेऊन कौतुकाने त्याची पाठ थोपटली. चहलशिवाय तिने कोच रिकी पाँटिंगचेही कौतुक केले.