Join us

अजिंक्य रहाणेची कमाल; सचिन, विराटच्या 'त्या' विक्रमाशी केली बरोबरी

दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर आणि शतकवीर कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी एका बाजूने किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणेही या विजयाचा एक शिल्पकार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 09:45 IST

Open in App

डर्बनः दक्षिण आफ्रिकेवर सहा विकेट्सनी विजय मिळवणाऱ्या टीम इंडियावर आणि शतकवीर कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी एका बाजूने किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणेही या विजयाचा एक शिल्पकार आहे. अत्यंत शांत आणि संयमी अर्धशतकी खेळी करणाऱ्या या शिलेदारानं कालच्या सामन्यात एक अशी किमया केली, जी आजवर फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीलाच जमली आहे. 

शिखर धवन बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात उतरला. त्यावेळी भारतानं दोन विकेट्स गमावून 67 धावा केल्या होत्या. विराट कोहली टिच्चून फलंदाजी करत होता, पण त्याला भक्कम साथीदाराची गरज होती. ती ओळखूनच तंत्रशुद्ध रहाणेनं खेळ केला. पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने त्यानं 86 चेंडूत 79 धावा फटकावल्या. विराटला अधिकाधिक संधी देण्याचा त्याचा प्रयत्नही वाखाणण्याजोगाच होता. 

अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील हे 24 वं अर्धशतक आहे आणि सलग पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये या पठ्ठ्याने अर्धशतक साजरं केलंय. सलग पाच अर्धशतकं झळकवण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या नावावर होता. आता त्यांच्यासोबत अजिंक्य रहाणेचं नावही जोडलं गेलंय. विराटने ही किमया दोन वेळा केली आहे. 

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 270 धावांचं आव्हान भारतानं 46व्या षटकातच पूर्ण केलं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताच्या फलंदाजीची सूत्रं आपल्या हाती घेतली होती. वनडे कारकिर्दीतील 33वे शतक फटकावणारा विराट कोहली आणि 79 धावांची शानदार अर्धशतकी खेळी करणारा अजिंक्य रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी रचली आणि तिथेच टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८अजिंक्य रहाणेविराट कोहलीसचिन तेंडूलकर