Join us

Ajinkya Rahane, IPL 2022: अजिंक्य रहाणेचं IPL करियर संपणार? एकेकाळचा कर्णधार आज संघातूनही बाहेर, विविध स्तरांवर चर्चा

अजिंक्य रहाणेने यंदा ५ सामन्यात केल्या ८० धावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:41 IST

Open in App

Ajinkya Rahane, IPL 2022: अजिंक्य रहाणे हा भारताचा एक दमदार फलंदाज. या मराठमोळ्या फलंदाजाने एक काळ IPL कर्णधार म्हणून गाजवला. राजस्थानच्या संघाचे नेतृत्व करताना त्याने आपली छाप पाडली. पण सध्य अजिंक्य रहाणेची अवस्था अशी झाली आहे की त्याला कर्णधारपद सोडाच पण संघातही स्थान मिळणं कठीण होऊन बसलं आहे. रहाणेला या वर्षी KKR च्या संघाने मूळ किमतीत विकत घेतले. सुरूवातीला अजिंक्यला संघात सलामीवीराची भूमिका देण्यात आली, पण नंतर मात्र त्याला डगआऊटमध्येच बसायची वेळ आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेचं IPL करियर संपणार की काय, अशी चर्चा विविध स्तरांवर सुरू आहे.

अजिंक्य रहाणेने IPL मध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व केले. त्यासोबतच त्याने कर्णधारपद भूषवत भरपूर धावादेखील केल्या. राजस्थानच्या संघात असताना त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद होते. त्याने त्याची भूमिका चोख बजावली. पण फलंदाजीत त्याला चमक दाखवता न आल्याने तो राजस्थान मधून बाहेर पडला. दिल्लीने त्याला लिलावात खरेदी केले. पण या वर्षी त्यांनी त्याच्यावर बोली लावली नाही. अखेरीस KKR ने त्याला संघात स्थान दिले.

कोलकाताच्या संघाकडून अजिंक्य रहाणेने हंगामाच्या सुरूवातीला सलामीवीर म्हणून प्रारंभ केला. त्याने पहिल्याच सामन्यात संयमी ४८ धावांची खेळी केली. पण त्यानंतर मात्र त्याला सूर गवसला नाही. एकूण ५ सामन्यात त्याला केवळ ८० धावाच करता आल्या. त्यानंतर मग त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी संघात अनुभवी आरोन फिंचने स्थान मिळवले.

अजिंक्य रहाणेच्या बाबतीत आणखी एक दुर्दैवी बाब म्हणजे, कोलकाताच्या संघाने कोणत्याही खेळाडूला दीर्घ काळ संधी दिली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताच्या संघात सतत संघात बदल केले. प्रत्येक सामन्यात कोलकाताने नवा संघ उतरवला. त्याचा फटका अजिंक्य रहाणेा बसला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने अशा दोन खेळाडूंना संघाबाहेर बसवले, ज्यांना त्यांनी लिलावाआधी रिटेन केले होते. त्यामुळे यापुढच्या सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता फारच विरळ आहे. अशा परिस्थितीत, हे अजिंक्यचं शेवटचं IPL असू शकतं, अशी चर्चा रंगल्याचे दिसत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२अजिंक्य रहाणेकोलकाता नाईट रायडर्सश्रेयस अय्यर
Open in App