मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची पुन्हा एकदा या पदावर बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. १२ नोव्हेंबरला होणाऱ्या 'एमसीए' निवडणुकीसाठी अजिंक्य यांच्याव्यतिरिक्त एकूण ७ उमेदवारांनी अर्ज केले होते. या सर्व उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने अजिंक्य यांच्या अध्यक्षपदाची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आता 'एमसीए'च्या आता इतर सर्व पदांसाठी मतदान होईल.
सलग दुसऱ्यांदा भूषवणार MCA चं अध्यक्षपद
'एमसीए' अध्यक्षपदासाठी अजिंक्य यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ. जितेंद्र आव्हाड, भाजप आ. प्रसाद लाड, उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, 'एमसीए'चे माजी संयुक्त सचिव शाह आलम शेख, माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी, टी२० मुंबई संचालन परिषदेचे अध्यक्ष विहंग सरनाईक आणि ॲपेक्स कौन्सिक सदस्य सूरज सामत यांनी अर्ज केले होते. मात्र, सोमवारी या सर्वांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांच्या 'एमसीए'मधील सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. याआधीसन गेल्या वर्षी अजिंक्य हे वयाच्या ३७ व्या वर्षी 'एमसीए'चे सर्वांत युवा अध्यक्ष बनले होते. त्यावेळी, त्यांनी माजी उपाध्यक्ष संजय नाईक यांचा तब्बल १०७ मतांनी पराभव केला होता.
सचिव ते अध्यक्ष असा राहिला प्रवास
अजिंक्य हे आधी २०२२ ते २०२४ दरम्यान ते 'एमसीए'चे सचिव होते, तसेच २०१९ ते २०२२ दरम्यान ते 'एमसीए' ॲपेक्स कौन्सिलचे सदस्य होते. अध्यक्षपदाच्या त्यांच्या कार्यकाळात 'एमसीए'ने शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन केले आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर तसेच माजी आयसीसी, बीसीसीआय आणि एमसीए अध्यक्ष शरद पवार यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी वानखेडे स्टेडियमवर माजी भारतीय कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या पुतळ्याची उभारण्याची घोषणाही केली होती.
राजदीप टी-२० लीगचे अध्यक्ष
'एमसीए' अध्यक्षपदाची लढत बिनविरोध होणार असली, तरी इतर पदांसाठी चुरस रंगणार आहे. यामध्ये उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड आणि स्वतंत्र उमेदवार नवीन शेट्टी यांच्यात चुरशीचा सामना रंगेल. सचिवपदासाठी शाहालम शेख आणि माजी सचिव उन्मेश खानविलकर आमनेसामने आले आहेत. त्याचवेळी, क्राॅस मैदानावरील प्रतिष्ठीत असलेल्या नॅशनल क्रिकेट क्लबचे प्रमुख आणि उद्योजक राजदीप गुप्ता यांची मुंबई टी-२० लीगच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.