Join us  

अंतिम सामन्यानंतर जमा झाला १ हजार किलो प्लॅस्टिकचा कचरा; त्यातून काय बनवलं, नक्की पाहा

World Cup Final Match: विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 7:57 PM

Open in App

World Cup Final Match: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा भारतीय संघासाठी कधी आनंदाचा तर कधी दु:खाचा ठरला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन भारताने केले होते. 

यजमान भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत जोरदार खेळ केला आणि पहिले १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने भारताला दणदणीत पराभव करून विजेतेपद पटकावले. हा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. आता या अंतिम सामन्याशी संबंधित एक बातमी समोर येत आहे. 

विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले होते. सामना संपल्यानंतर स्टेडियममध्ये कचऱ्याचा ढीग साचला होता. स्टेडियममधून सुमारे १ हजार किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. एका स्वयंसेवी संस्थेने या प्लास्टिक कचऱ्याचा अतिशय चांगला वापर केला आणि त्यापासून १० बेंच (बसण्यासाठी) आणि रिफ्लेक्टर जॅकेट बनवले. या एनजीओने या सर्व वस्तू अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनला (एएमसी) सुपूर्द केल्या आहेत.

अहमदाबादच्या बागांमध्ये सर्व बेंच बसवण्यात येणार-

विश्वचषकाचा अंतिम सामन्यानंतर मैदानाची साफसफाई करताना पाणी आणि पेयाच्या बाटल्या जमा झाल्याची माहिती आहे. या प्लास्टिक कचऱ्याचे वजन सुमारे एक हजार किलो होते. या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून स्वयंसेवी संस्थेने १० बेंच तयार केले आहेत. प्रत्येक बेंच बनवण्यासाठी सुमारे ५० किलो प्लास्टिक कचरा वापरण्यात आला. हे सर्व बेंच एएमसीला देण्यात आले आहेत, जे लवकरच अहमदाबादच्या बागांमध्ये दिसणार आहेत. १० बेंच बनवल्यानंतर उर्वरित प्लास्टिक रिफ्लेक्टर जॅकेट बनवण्यासाठी वापरण्यात आले. एक रिफ्लेक्टर जॅकेट तयार करण्यासाठी १० पीईटी बाटल्या वापरण्यात आल्या. हे रिफ्लेक्टर जॅकेट अहमदाबाद महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :बीसीसीआयआयसीसीभारतप्लॅस्टिक बंदी