दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने धडाकेबाज शतक ठोकत भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. एवढेच नाही तर आपल्या टीकाकारांनाही चोख उत्तर दिले. हे विराटचे एकदिवसीय सामन्यांतील ५२ वे शतक होते. आता तो एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे.
या विजयानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार स्वीकारताना कोहलीने आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले. तसेच, बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यावरही निशाणा साधला.
...तरीही त्याच्या फॉर्ममध्ये कोणतीही कमतरता दिसली नाही -
गेल्या काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंवर देशांतर्गत (डोमेस्टिक) क्रिकेट खेळण्याचा दबाव आहे. यामुळे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर, २५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा वनडे खेळलेल्या कोहलीने थेट ३० नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन केले, तरीही त्याच्या फॉर्ममध्ये कोणतीही कमतरता दिसली नाही.
जोवर मला मानसिकरित्या चांगले वाटते, तोवर मी खेळू शकतो... -
सामन्यानंतर त्याच्या तयारीसंदर्भात विचारले असता, त्याने बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. कोहली म्हणाला, “जर आपण समजू शकाल तर, माझा कधीही फार तयारीवर विश्वास नाही. माझे संपूर्ण क्रिकेट हे मानसिक (मेंटल) राहिले आहे. जोवर मला मानसिकरित्या चांगले वाटते, तोवर मी खेळू शकतो.”
तर आता, कोहली आगामी विजय हजारे वनडे स्पर्धेसाठी उपलब्ध असेल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे.