ठळक मुद्दे संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं युसुफ पठाणनं केलं आवाहन.दोघंही नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेत झाले होते सहभागी.
देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल एसबीआयनं नुकताच दिला आहे. या दुसऱ्या लाटेत अनेक अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. युसुफ पठाणनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली. तसंच त्यांनं आपल्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यानं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोड सेफ्टी ही क्रिकेट सीरिज पार पडली. यावेळी सचिन तेंडुलकर, युसुफ पठाण, युवराज सिंग, इरफान पठाण यांच्यासारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.
"माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षण आढळून आली आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. तसंच आवश्यक ती काळजी आणि औषधोपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोकं माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली कोरोना चाचणी करून घ्यावी," असं आवाह युसुफ पठाण यानं केलं आहे.
सचिन तेंडुलकरलाही कोरोनाची लागण"मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या" असं सचिन तेंडुलकरनं म्हटलं. तसेच सचिनच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ही तब्बल १२ कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे.