दुबई - केपटाऊन कसोटीमधील पराभवामुळे भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. त्याबरोबरच या सामन्यातील खराब खेळाचा फटका भारतीय संघातील खेळाडूंनाही बसला असून, कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीमधील मानांकनामध्ये घसरण झाली आहे. तर केप टाऊनमध्ये भेदक गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडा याने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकत क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले आहे.
केप टाऊन कसोटीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने विराट कोहलीला १३ गुणांचे नुकसान झाले असून, त्याची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ पहिल्या, तर इंग्लंडचा कर्णधार जो रूट दुसऱ्या स्थानी आहे. विराट प्रमाणेच चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे. २५ गुणांचे नुकसान झाल्याने पुजारा तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे.
सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने पहिल्या कसोटीत भारतीय संघाला 72 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तिसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत दुसऱ्या डावात आफ्रिकन फलंदाजांची दाणादाण उडवली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 130 धावांत गुंडाळल्याने भारतासमोर विजयासाठी 208 धावांचे माफक आव्हान होते. मात्र दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारताची फलंदाजीही फिलँडरच्या वेगवान माऱ्यासमोर कोसळली. त्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या कसोटीमधील विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
केप टाऊन कसोटीत हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता भारताचे उर्वरित फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात २०९ आणि दुसऱ्या डावात केवळ १३५ धावा जमवता आल्या होत्या.