Join us  

निवड समितीच्या निर्णयचा आदर करतो, टी-20 संघातून वगळल्यानंतर अजिंक्य रहाणेची प्रतिक्रिया

सलग चार एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. चांगली कामगिरी करूनही रहाणेला संघातून डच्चू देण्यात आल्याने...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 7:43 PM

Open in App

मुंबई - सलग चार एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आश्चर्यकारकरित्या वगळण्यात आले आहे. चांगली कामगिरी करूनही रहाणेला संघातून डच्चू देण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र संघव्यवस्थापन आणि निवड समितीच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो, अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेने दिली आहे. नुकत्यात आटोपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत अजिंक्य रहाणेने सलग चार अर्धशतके फटकावली होती.  रहाणे म्हणाला, "संघव्यवस्थापन आणि निवड समितीने घेतलेल्या निर्णयाचा मी सन्मान करतो. संघात निवड होण्यासाठी स्पर्धा असणे आवश्यक आहे. ज्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. ज्यांना संधी मिळते त्या सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे. मलाही स्पर्धा करायला आवडते." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत शिखर धवनच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचे अजिंक्य रहाणेने सोने केले होते. त्याने सलग चार सामन्यांत अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सलामी देण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील आपल्या कामगिरीबाबत रहाणेने समाधान व्यक्त केले आहे." या मालिकेतील माझ्या कामगिरीवर मी खूश आहे. मला संधी आणि जबाबदारी मिळाली आणि मी अपेक्षेनुरूप फलंदाजी केली. मी अर्धशतकांना शतकांमध्ये परिवर्तित करू शकलो असतो. येत्या काळात अर्धशतकांना शतकांमध्ये परिवर्तित करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन," असे रहाणे म्हणाला. रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सलामीला येताना रोहित शर्मासोबत तीन शतकी भागीदाऱ्या केल्या होत्या.  ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या तीन टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज जाहीर करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या संघामधून अजिंक्य रहाणेला आराम देण्यात आला, तर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन झालं आहे. त्याचप्रमाणे,  उमेश यादव आणि शमी यांनाही संघातून वगळण्यात आले. त्याबरोबरच कौटुंबिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीया मालिकेतून माघार घेणाऱ्या शिखर धवनचे टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.  ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी रांची येथे होईल, 10 ऑक्टोबरला दुसरा सामना गुवाहटीत आणि तिसरा टी-20 सामना 13 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. 

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआॅस्ट्रेलिया