चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या विक्रमी विजयात मोलाचा वाटा उचलणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने एक धक्कादाय खुलासा केलाय. ज्या दुबईच्या मैदानात चॅम्पियनचा टॅग लागला त्याच मैदानातील खराब कामगिरीनंतर धमकी देणारे फोन आले होते, या कटू आठवणीला भारतीय फिरकीपटूनं उजाळा दिला आहे. चार वर्षांपूर्वी वरुण चक्रवर्ती हा युएईच्या मैदानात रंगलेल्या २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप संघाचा भाग होता. दुबईच्या मैदानातील खराब कामगिरीनंतर त्याच्यासोबत काय घडलं ते क्रिकेटरनं चॅम्पियन झाल्यावर सांगितले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ती स्पर्धा वरुण चक्रवर्तीसाठीही भयावह स्वप्नासारखीच
२०२०-२१ च्या आयपीएल हंगामातील लक्षवेधी कामगिरीनंतर वरुण चक्रवर्तीची २०२१ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात वर्णी लागली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा प्रवास साखळी फेरीत संपुष्टात आला. वरुण चक्रवर्तीसाठी ही स्पर्धा भयावह स्वप्नासारखीच होती. कारण तीन सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.
अपेक्षा भंग झाला अन् डिप्रेशनमध्ये गेलो
वरुण चक्रवर्तीनं एका पॉडकास्टमध्ये गप्पा गोष्टी करताना २०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर घडलेली भयावह घटना सांगितली आहे. तो म्हणाला की, २०२१ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धाही माझ्यासाठी खूपच खराब राहिली. त्यामुळे मी डिप्रेशनमध्येही गेलो होतो. खूप मोठ्या अपेक्षांसह टीममध्ये सामील झालो. पण एकही विकेट मिळाली नाही. त्यानंतर ३ वर्षे संघ निवडी वेळी माझा विचारही करण्यात आला नाही.
त्यांनी मी कुठं राहतो ती माहिती काढली, विमानतळावरून माझा पाठलागही केला
या स्पर्धेनंतर भारतात परतण्या आधीपासूनच मला धमकीचे फोने येऊ लागले होते. तू इकडे येऊ चनकोस, अशा आशयाच्या शब्दांत धमकावण्यात आले. मी कुठं राहतो याचाही शोध घेतला गेला. स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यावर मायदेशी परतलो. विमानतळावरुन घरी परतत असताना काही लोकांनी दुचाकीवरून माझा पाठलागही केला होता, ही गोष्टही त्याने शेअर केली आहे.
तीन वर्षांनी कमबॅक अन् आता चॅम्पियनचाही लागला टॅग
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तब्बल ३ वर्षांनी वरुण चक्रवर्तीला पुन्हा टीम इंडियात संधी मिळाली. यावेळी मात्र तो मागे पडला नाही. प्रत्येक सामन्यात गठ्ठ्यानं विकेट घेत या पठ्ठ्यानं आधी टी-२० संघातील स्थान पक्के केले. त्यानंतर अखेरच्या क्षणी त्याला दुबईचं तिकीट मिळालं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळायला संधी मिळाली अन् तो टीम इंडियाचा हुकमी एक्काही ठरला.