Join us

AFGvsWI : 140 किलोच्या 'वजनदार' गोलंदाजाच्या फिरकीची जादू; भारतीय खेळपट्टीवर नोंदवला विक्रम

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून चर्चेत आलेल्या 140 किलो वजनाच्या आणि 6.5 फुटाच्या रहकिम कोर्नोवॉलनं बुधवारी आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना नाचवलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 15:01 IST

Open in App

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून चर्चेत आलेल्या 140 किलो वजनाच्या आणि 6.5 फुटाच्या रहकिम कोर्नोवॉलनं बुधवारी आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना नाचवलं. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकमेव कसोटी सामना भारतात लखनौ येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या रहकिमनं आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्यानं आपल्या फिरकीच्या तालावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना नाचवलं आणि निम्म्याहून अधिक विकेट्स घेत विंडीजला फ्रंटसिटवर बसवलं आहे. भारतीय खेळपट्टींवर 7 विकेट्स घेणारा विंडीजचा दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी 1975मध्ये सर अँडी रोबर्ट्स यांनी 64 धावांत 7 विकेट्स घेतल्या होत्या. 

कसोटीत पदार्पण करताना रहकिमनं भारताच्या चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना बाद केलं होतं. आज त्यानं कारकिर्दीतल्या दुसऱ्या सामन्यात सहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या सत्रापर्यंत त्यानं 67 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 66 षटकांत 8 बाद 183 धावा केल्या होत्या. रहकिमची ही कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.  त्यांच्याकडून जावेद अहमदी ( 39), आमीर हम्झा (34)  आणि अफसर जझाई ( 32) यांनी संघर्ष दाखवला. अफगाणिस्तानचा पहिला डाव 187 धावांत गुंडाळण्यात विंडीजला यश आलं. डावाच्या अखेरीस रहकिमनं 75 धावांत 7 विकेट्स घेतल्या. 

ॲंटिग्वा येथे जन्मलेल्या रहकिमची उंची 6.5 फुट आहे आणि 140 किलो वजन आहे. कसोटी संघात दाखल होण्यापूर्वी रहकिमनं आपल्या तंदुरुस्तीसाठी बरीच मेहनत घेतली. विंडीज संघाचे डॉक्टर आणि ट्रेनर त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून होते. रहकिमनं स्थानिक क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. त्यानं 97 सामन्यांत 24.43 च्या सरासरीनं 2224 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 13 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने 260 विकेट्सही घेतल्या आहेत.

वय 26 वर्षे, 140 किलो वजन, 6.5 फूट उंची; जाणून घ्या क्रिकेटमधी या वजनदार व्यक्तीबद्दल

टॅग्स :वेस्ट इंडिजअफगाणिस्तान