काबूल - इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा आज करण्यात आली. विश्वचषकासाठी संघ निवडताना अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने संघाच्या नेतृत्वात बदल केला असून, असगर अफगाण याला कर्णधारपदावरून हटवून गुलबदीन नईब याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीस संघामध्ये वेगवान गोलंदाज हमीद हसनला स्थान देण्यात आले आहे. मात्र नेतृत्वात केलेल्या बदलाप्रमाणेच हसनचे पुनरागमनही अफगाणिस्तानच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण दोन वर्षांनंतर त्याचे संघात पुनरागमन होत आहे. तसेच त्याच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघात रशिद खान, मोहम्मद शहझाद, मोहम्मद नबी या स्टार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच समीउल्लाह शेनवारी, हजरतुल्ला जजाई, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी यांना स्थान देण्यात आले आहे.
विश्वचषकासाठी निवडलेला अफगाणिस्तानचा संघ पुढीलप्रमाणे गुलबदीन नईब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झरदान, हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्लाह शाहिदी, नजीबुल्लाह झरदान, समीउल्लाह शेनवारी, मोहम्मद नबी, रशिद खान, दौलत झरदान, आफताब आलम, हामिद हसन आणि मुजीब उर रहमान.