Afghanistan Wins By 8 Runs England Out : लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगलेल्या ३०० पारच्या लढाईत अफगाणिस्तानच्या संघानं इतिहास रचला आहे. तगड्या बॅटिंग लाइनअपसह धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला त्यांनी झुकवलं आहे. "अफ़गानिस्तान नाम सुनके फ्लावर समझे क्या,फ्लावर नहीं फायर है" असा शो दाखवत अफगाणिस्तान संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून इंग्लंडचा खेळ खल्लास केलाय. या विजयासह अफगाणिस्तानचा सेमी फायनलच्या आशा कायम राहिल्या आहेत. यासाठी आता त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असेल. जर अफगाणिस्तानच्या संघानं ऑ्स्ट्रेलियाविरुद्ध देखील हीच धमक दाखवली तर हा संघ सेमीत धडक मारू शकतो. दुसरीकडे इंग्लंडचा संघ या पराभवासह स्पर्धेतून आउट झाला आहे. साखळी फेरीत ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकाला शतकी प्रत्युत्तर, पण शेवटी अफगानिस्तानतच्या संघानं बाजी मारली
टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यावर इब्राहिम झाद्रान याच्या १७७ धावांच्या विक्रमी शतकाच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघानं निर्धिरात ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३२५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खरब झाली. शंभरीच्या आत आघाडीचे तीन गडी तंबूत परतले होते. जो रुटनं शतकी खेळी करत संघाला मॅचमध्ये आणले. पण त्याची विकेट पडली अन् मॅच फिरली. जो रुट १११ चेंडूत १२० धावा करुन बाद झाला. त्यानंतर जेमी ओव्हर्टननं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. पण तो बाद झाला अन् इंग्लंडच्या सामना जिंकण्याच्या आशाच धूसर झाल्या. अखेरच्या षटकात अफगाणिस्तान गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी करत इंग्लंडला ३१७ धावांवर ऑल आउट करत सामना ८ धावांनी जिंकला.
अझमतुल्लाह ओमरझाईनं फिरवली मॅच
इंग्लंडचा अनुभवी बॅटर जो रुट याने सामना इंग्लंडच्या बाजूनं सेट केले होता. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत अफगाणिस्तानचं काही खरं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इंग्लंडच्या डावातील ४६ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ओमरझाईनं जो रुटची विकेट घेतली. हा क्षण या मॅचमधील टर्निंग पाँइट ठरला. इब्राहिम झाद्रान याला फलंदाजीवेळी साथ देणाऱ्या अझमतुल्लाह ओमरझाई याने गोलंदाजीत कमाल करून दाखवली. त्याने ९.५ षटकात ५८ धावा खर्च करताना इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला. याशिवाय मोहम्मद नबीनं २ विकेट्स घेतल्या. फारुकी, राशीद खान आणि गुलबदीन नैबी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला.