मुंबई- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरू रमाकांत आचरेकर सरांचं निधन झालं आहे. रमाकांत आचरेकर सरांनी सचिन तेंडुलकरला घडवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. सचिनला शारदाश्रम शाळेत असल्यापासून आचरेकर सरांनी क्रिकेटचे धडे दिले. शारदाश्रम शाळा सुटली की सचिन काका-काकूंकडे जायचा. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन खेळण्यासाठी पुन्हा सज्ज व्हायचा. विशेष म्हणजे आचरेकर सरांचे क्रिकेटच्या मैदानावरचे सचिनच्या बालपणीचे किस्से प्रसिद्ध आहेत.
असाच एक किस्सा सचिनचं आयुष्य घडवण्यासाठी निर्णायक ठरला आहे. सचिन फलंदाजीसाठी उतरल्यानंतर आचरेकर सर स्टम्पवर एक रुपयाचं नाणं ठेवून म्हणायचे जर सरावात बाद झाला नाहीस, तर ते नाणं तुला बक्षीस म्हणून देईन, ते पाहून सचिनबरोबरचे इतर सहकारी गोलंदाज सचिनची विकेट घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. आचरेकर सरांच्या किश्श्यामुळेच सचिनचा क्रिकेट खेळण्याचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला. तसेच सचिननंही ‘थप्पड’ आणि ‘लेट कट’चे किस्से सांगितले आहेत. सचिन वयाच्या 39 व्या वर्षीही ताज्या तवान्यासारखा खेळायचा. या फिटनेसचेही अनेकदा सचिननं गुपित उलघडले होते.
तो म्हणाला होता, मी सामन्यात फलंदाजी केल्यानंतर सर मैदानाला फे-या मारायला सांगत नव्हते. परंतु सराव करून थकल्यानंतर आचरेकर सर मला संपूर्ण बॅटिंग गिअर घालून संपूर्ण मैदानाला धावत जाऊन फेरी मारायला लावायचे. हेच त्या फिटनेसचे गुपित आहे. त्या कष्टांचा आज एवढी वर्षे क्रिकेट खेळण्यासाठी खूप उपयोग होत आहे, असे सचिनने सांगितले होते. आता आणखी किती काळ क्रिकेट खेळेन माहीत नाही, पण माझ्या क्रिकेट कारकिर्दीचे श्रेय आचरेकर सरांना द्यावेच लागेल, असे सांगताना तर सचिनला भावना आवरणे कठीण झाले होते.