भारतीय महिला क्रिकेटमधील दोन महान खेळाडूंना महत्त्वपूर्ण सन्मानाने सन्मानित करण्यात आले. एसीए-व्हीडीसीए विशाखापट्टणम क्रिकेट स्टेडियममधील दोन स्टँड्सना आता माजी भारतीय कर्णधार मिताली राज आणि यष्टीरक्षक-फलंदाज रवी कल्पना यांची नावे देण्यात येणार आहेत. १२ ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यापूर्वी या स्टँडचे अनावरण केले जाईल.
हा ऐतिहासिक निर्णय भारतीय सलामीवीर स्मृती मानधना हिने सुचवलेल्या एका कल्पनेतून साकार झाला. ऑगस्टमध्ये "ब्रेकिंग द बाउंड्रीज" या कार्यक्रमादरम्यान मानधनाने आंध्र प्रदेशचे माहिती तंत्रज्ञान (IT) मंत्री नारा लोकेश यांच्यासमोर ही कल्पना मांडली होती.मंत्र्यांनी मानधनाचा हा प्रस्ताव तात्काळ स्वीकारला आणि आंध्र क्रिकेट असोसिएशनशी चर्चा केली. त्यानंतर, महिला क्रिकेटमधील या दोन दिग्गज खेळाडूंना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल हा महत्त्वपूर्ण सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, १२ ऑक्टोबरचा हा कार्यक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील केवळ एक सामना नसून, भारतीय महिला क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाला आदरांजली वाहण्याचा एक भावपूर्ण क्षण असेल.
मिताली राजची गौरवशाली कारकीर्द
मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज मानली जाते. तिच्या कारकिर्दीतील आकडेवारी तिची महानता सिद्ध करते. मिताली राजने एकूण १२ कसोटी, २३२ एकदिवसीय आणि ८९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेटमध्ये तिच्या नावावर १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ६९९ धावा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने ७ हजार ८०५ धावा केल्या आहेत, ज्यात ७ शतक आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-२० क्रिकेटमध्ये तिच्या नावावर २ हजार ३६४ धावा आहेत.
रवी कल्पनाची कारकिर्द
रवी कल्पना ही आंध्र प्रदेशातील एक प्रेरणादायी क्रिकेटपटू आहे.तिने २०१५ ते २०१६ दरम्यान भारतासाठी ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तिच्या कामगिरीने आणि संघर्षाने अरुंधती रेड्डी, एस. मेघना आणि एन. श्री चरणी यांसारख्या अनेक तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली आहे.