कर्नाटक प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या फिक्सिंगच्या कचाट्यात आता भारतीय संघाचा गोलंदाज सापडला आहे. कर्नाटक प्रीमिअर लीगमधील फिक्सिंग प्रकरणात आतापर्यंत काही खेळाडूंवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यात आता भारताचा गोलंदाज अडकल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळाले आहे. केंद्रीय गुन्हे विभागानं भारतीय गोलंदाजाला या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.
भारताचा माजी गोलंदाज अभिमन्यू मिथून असे या गोलंदाजाचे नाव आहे. कर्नाटक प्रीमिअर लीगमधील शिवामोग्गा लायन्स संघाचा तो कर्णधार आहे. त्याला चौकशीसाठी बोलावल्याच्या वृत्ताला सहपोलीस आयुक्त ( गुन्हे) संदीप पाटील यांनी दुजोरा दिला. ''मिथून याला गुन्हे विभागासमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. कर्नाटक प्रीमिअर लीगच्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात झालेल्या फिक्सिंग प्रकरणाबाबत त्याला विचारणा करण्यात येणार आहे,'' असं पाटील यांनी सांगितले.
या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बेळगावी पँथर्स संघाचे मालक अली अस्फाक थारा याचाही समावेश आहे. तसेच केंद्रीय गुन्हे विभागानं या प्रकरणासंदर्भात कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला नोटीसही पाठवली आहे. 2008पासून ही लीग खेळवण्यात येत आहे. यातील बरेच खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्येही चमकदार कामगिरी करत आले आहेत.