Join us

'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 19:03 IST

Open in App

APP Saurabh Bharadwaj on Asia Cup Ind vs Pak: रविवारी आशिया कप स्पर्धेमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरुन राजकीय वातावरण अजूनही तापलं आहे. भारत पाक सामन्यावर आम आदमी पक्षानेही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पाकला पराभूत करुन भारतीय सैन्यान पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित असल्याचे कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटलं होतं. दुसरीकडे आप नेते सौरभ भारद्वाज यांनी जर सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबियांविषयी काही वाटत असेल त्याने या सामन्यातून मिळालेली रक्कम त्यांना देऊन टाकावी असं आव्हान दिलं आहे.

आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव याने षटकार मारत भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. सूर्यकुमारने सामन्याच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत पहलगाम हल्ल्याची आठवण ठेवत पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. त्यानंतर बोलताना हा विजय आमच्या सर्व शस्त्रदलांना समर्पित करत असल्याचे सूर्यकुमारने म्हटलं. यानंतर आप नेते सौरभ भारद्वाज यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआय आणि आयसीसी यांना आव्हान दिले आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर भारत-पाकिस्तानमधून मिळवलेले पैसे पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या पत्नींना द्यावेत, असं सौरभ भारद्वाज म्हणाले.

"सूर्यकुमार यादव, जर तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्या बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये हिंमत असेल, तर या ब्रॉडकास्टिंग लाईनमधून आणि या संपूर्ण व्यवसायातून तुम्ही जे काही पैसे कमवले आहेत ते शहीदांच्या विधवांना द्या. मग आम्हीही मान्य करू. तुमच्यात हिंमत नाहीये तेवढी," असं सौरभ भारद्वाज म्हणाले.

"सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन न करून १४० कोटी लोकांच्या देशावर मोठे उपकार केलेत. मला तर वाटते की त्याने फक्त जन्म घेऊन भारतावरच मोठे उपकार केलेत. ज्यांच्या मुलांनी सीमेवर आपले प्राण दिले आहेत त्यांच्यापेक्षाही हे मोठे आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्या महानतेचा ढोल वाजवत आहे. जर भारत सरकारला वाटत असेल तर त्याला भारतरत्न देऊ शकतात," असंही सौरभ भारद्वाज म्हणाले.

"विरोध असूनही, भारताच्या केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आयोजित केला. आम्हाला सांगितले की दुबईतील त्या छोट्या स्टेडियमची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकिटे खरेदी केल्यानंतर, भारतीयांचा विवेक जागा झाला आणि त्यांनी ठरवले की जर ते या भारत-पाकिस्तान सामन्याला गेले तर त्यांना  देशद्रोही म्हटले जाईल," असे भारद्वाज यांनी म्हटलं.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

"आम्ही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबायांसोबत उभे आहोत. हा विजय आमच्या सर्व शस्त्रदलांना समर्पित करायचा आहे. ज्यांनी खूप धैर्य दाखवले. तेच आमचे प्रेरणास्थान आहेत," असं सूर्यकुमार यादवने म्हटलं होतं.

टॅग्स :सूर्यकुमार यादवभारत विरुद्ध पाकिस्तानआप