IND vs SA 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. सूर्यकुमार यादवच्या १०० आणि यशस्वी जैस्वालच्या ६० धावांच्या जोरावर भारताने २०१ धावा उभ्या केल्या. त्यानंतर कुलदीप यादवने पाच विकेट्स घेत आफ्रिकेचा संपूर्ण संघ ९५ धावांत तंबूत पाठवला. भारताने १०६ धावांनी मॅच जिंकली. या सामन्यानंतर इम्पॅक्ट फिल्डरचा पुरस्कार मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) दिला गेला.
यशस्वी जैस्वाल व सूर्यकुमार यादव यांनी ७० चेंडूंत ११२ धावांची भागादीर केली. यशस्वी ४१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. रिंकू सिंगने ( १४) सूर्यासह २६ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. सूर्याने ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावा केल्या. चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताने २० षटकांत ७ बाद २०१ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ १३.५ षटकांत ९५ धावांत तंबूत परतला. कुलदीप यादवने १७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात मोहम्मद सिराजने ३ -१-१३-० अशी स्पेल टाकली. त्याने पहिलेच षटक निर्धाव टाकून आफ्रिकेवर दडपण निर्माण केले. त्यात त्याने आफ्रिकेचा सलामीवीर रिझा हेंड्रिक्स याला अप्रतिम थ्रो करून रन आऊट केले.