Join us

शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

Akash Deep News: नुकत्याच आटोपलेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाला मिळालेल्या यशामध्ये अनेक खेलांडूंचं मोलाचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं होतं. त्यात भारतीय संघाने दुसऱ्या आणि पाचव्या कसोटीमध्ये मिळवलेल्या यशामध्ये भारतीय संघातील नवोदित खेळाडू आकाश दीप याने मोलाचं योगदान दिलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:08 IST

Open in App

नुकत्याच आटोपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरीचं प्रदर्शन केलं होतं. इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. भारतीय संघाला मिळालेल्या या यशामध्ये अनेक खेलांडूंचं मोलाचं योगदान महत्त्वपूर्ण ठरलं होतं. त्यात भारतीय संघाने दुसऱ्या आणि पाचव्या कसोटीमध्ये मिळवलेल्या यशामध्ये भारतीय संघातील नवोदित खेळाडू आकाश दीप याने मोलाचं योगदान दिलं होतं. शेवटच्या कसोटीत तर आकाश दीप याने नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीस येत दिलेलं योगदान बहुमूल्य ठरलं होतं. दरम्यान, इंग्लंड दौरा गाजवून मायदेशी परतलेल्या आकाश दीप याचं आज त्याच्या गावामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.

इंग्लंड दौरा आटोपल्यानंतर आकाश दीप हा थेट लखनौ येथे पोहोचला होता. तिथे त्याने कुटुंबीयांचं स्वप्न पूर्ण करताना टोयोटा फॉर्च्युनर गाडी खरेदी केली होती. दरम्यान, आकाश दीप आज बिहारमधील रोहतास जिल्ह्यात असलेल्या सासाराम येथील आपल्या घरी पोहोचला. तिथे त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.

आकाश दीप सासाराममध्ये पोहोचताच शेकडो वाहनांच्या ताफ्याद्वारे त्याचं स्वागत केलं गेलं. जागोजागी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच ढोलताशे वाजवण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले चाहते हाहात तिरंगा घेऊन भारत माता की जय, आकाश दीप झिंदाबाद, अशा घोषणा देत होते. आकाश दीपचा ताफा ज्या ज्या गावातून गेला तिथे तिथे फुलांचे हार घालून त्याचं स्वागत करण्यात आलं.

सासाराम येथे पोहोचलेल्या आकाश दीप याने सर्वप्रथम महापुरुषांना आणि स्वातंत्रसैनिकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर त्याने नमस्कार करून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्याच्या स्वागताला तरुण आणि मुलांनी मोठी गर्दी केली होती.   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबिहार