Join us
Daily Top 2Weekly Top 5

संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय

अय्यरच्या नेतृत्वामध्ये धोनीचा संयम अन् विराटची आक्रमकता दोन्हीचा उत्तम मिलाफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:46 IST

Open in App

नवी दिल्ली : कोलकाताचा १० वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ गतवर्षी संपवणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबची पहिल्या आयपीएल विजेतेपदाची संधी मंगळवारी थोडक्यात हुकली. पण, भविष्यात भारताला ज्या प्रकारच्या कर्णधाराची आवश्यकता असू शकते, असा कर्णधार म्हणून त्याने स्वतःला स्थापित केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय क्रिकेटचा नवा कॅप्टन कूल म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्यानंतर अय्यर संघाला आयपीएलच्या तीन अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचवणारा तिसरा कर्णधार ठरला आहे. त्याची ही कामगिरी खूप विशेष आहे. कारण त्याने गेल्या पाच वर्षात तीन वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांसोबत हे केले आहे. या महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंसाठी ही मोठी गोष्ट आहे.

कोलकाताने गेल्या वर्षी त्याला जाऊ दिले. कारण फ्रँचायझीला त्याची मोठ्या रिटेन्शन फीची मागणी योग्य वाटली नाही. कोलकाताचे हे नुकसान पंजाबसाठी मोठा फायदा ठरला. पंजाब संघाला ३० वर्षीय खेळाडूच्या रूपात एक समजूतदार आणि उत्साही कर्णधार मिळाला, कारकिर्दीतील चढ-उतारांना हुशारीने कसे हाताळायचे, हे जाणणारा कर्णधार अशी श्रेयसची प्रतिमा झाली आहे.

शुभमन गिलच्या कर्णधारपदाची अजून परीक्षा झालेली नाही. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून त्याला कठीण परीक्षेला सामोरे जावे लागेल. पण, ३ जून २०२५नंतर श्रेयस संतोष अय्यर हा भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक मानला जाईल.

धोनीचा संयम अन् विराटची आक्रमकता

अय्यरच्या कर्णधारपदात करिश्माई महेंद्रसिंग धोनीचा संयम, त्याची संवेदनशीलता, विराट कोहलीची आक्रमक वृत्ती आणि रोहित शर्मासारख्या 'बिंदास मुंबईकर'चा स्वभाव यांचा मिलाफ दिसत आहे. मंगळवारी पराभव पत्करावा लागला तरी अय्यरने आत्मविश्वास ढळू दिला नाही.

रिकी पाँटिंग यांनाही आश्चर्याचा धक्का

इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयसची भारतीय संघात निवड न झाल्याने पंजाबचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.ते म्हणाले की, मला खूप वाईट वाटले. पण, त्याने ते खूप सकारात्मकपणे घेतले आहे आणि तो पुढे गेला. त्याच्या डोळ्यात प्रत्येक वेळी चांगली कामगिरी करण्याची इच्छा असते.

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५श्रेयस अय्यरपंजाब किंग्समहेंद्रसिंग धोनीरोहित शर्मा