Join us

न्यूझीलंडपुढे ‘जायंट किलर’ अफगाणिस्तानचे कडवे आव्हान

नवी दिल्लीत इंग्लंडला ६९ धावांनी नमविणारे अफगाण खेळाडू पुन्हा एका अपसेटसाठी सज्ज आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 05:50 IST

Open in App

चेन्नई : चॅम्पियन इंग्लंडला पराभवाची धूळ चारून अन्य संघांना धोक्याचा इशारा देणारा जायंट किलर अफगाणिस्तानपुढे बुधवारी वनडे विश्वचषकात न्यूझीलंड संघ असेल. किवी खेळाडूंना विजयी घोडदौड सुरू ठेवायची असल्याने  प्रतिस्पर्धी संघाला सहज लेखण्याची चूक करणार नाहीत. आतापर्यंत उभय संघ वनडेत केवळ दोनदा आमनेसामने आले. त्यात दोन्ही वेळा बाजी मारली ती न्यूझीलंडने.    

नवी दिल्लीत इंग्लंडला ६९ धावांनी नमविणारे अफगाण खेळाडू पुन्हा एका अपसेटसाठी सज्ज आहेत. तीन सामने जिंकूनही न्यूझीलंड धावगतीमुळे भारतानंतर दुसऱ्या स्थानी आहे. हशमतुल्लाह शाहिदीच्या अफगाण संघाने बांगलादेश आणि भारताविरुद्ध सामने गमावल्यानंतर ऐतिहासिक विजय नोंदविला.

नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे यष्टिरक्षक- फलंदाज टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. मागच्या सामन्यात केनने बांगलादेशविरुद्ध ७८ धावा ठोकल्या होत्या.  वेगवान गोलंदाज टिम साऊदी अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला खरा मात्र तो खेळू शकेल, हे स्पष्ट नाही. या संघाच्या आघाडीच्या फळीत  विल यंग, डेव्होन कॉन्वे आणि  डेरिल मिचेलसारखे फलंदाज आहेत. अष्टपैलू रचिन रवींद्र यानेही लक्षवेधी कामगिरी केली. आता त्यांची गाठ राशिद खान आणि मोहम्मद नबीच्या फिरकीशी पडणार आहे. चेपॉकची वळण घेणारी खेळपट्टी किवी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकेल. 

अफगाणिस्तानचा सलामीवीर  रहमानुल्लाह गुरबाज याने दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली तर  कर्णधार शाहिदी, अजमतुल्लाह उमरजई आणि इकराम अलीखिल  यांनीदेखील उपयुक्त योगदान दिले आहे. त्यांना  ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांचे वेगवान चेंडू  तसेच रवींद्र आणि मिशेल सॅंटनरच्या फिरकी माऱ्याला तोंड द्यावे लागणार आहे.

टॅग्स :न्यूझीलंडअफगाणिस्तानवन डे वर्ल्ड कप