मुंबई : पाकिस्तानचे खेळाडू दुसऱ्यांना चिमटा काढण्यात पटाईत असतात. आता स्टीव्हन स्मिथने भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. पण तरीही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटूने त्याला चिमटा काढल्याचे पाहायला मिळाले आहे.
तिसऱ्या सामन्यात मोहम्मद शमीने वॉर्नरला बाद करत मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर लगेचच एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना फिंच बाद झाला. ऑस्ट्रेलियाची अवस्था दोन बाद ५६ अशी झाली असताना स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसºया गड्यासाठी १२७ धावांची भागीदारी केली.ही जोडी भारतीयांसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जडेजाने लाबुशेनला बाद केले. त्याने ५४ धावा केल्या. यानंतर स्मिथने यष्टीरक्षक कॅरीला सोबतीला घेत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. कॅरीने ३५ धावा केल्या. यादरम्यान स्मिथने आपले शतक पूर्ण केले. स्मिथने शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी करीत संघाला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्याने १३२ चेंडूंत १३१ धावांची खेळी केली.
जेव्हा स्मिथने ८० धावा केल्या होत्या, तेव्हा तो ८० चेंडू खेळला होता. पण जेव्हा त्याने १३१ धावांची खेळी साकारली त्यावेळी तो १३२ चेंडू खेळला होता. आता ही खेळी एकदिवसीय क्रिकेटमधली चांगली खेळी आहे. पण तरीही पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने स्मिथला चिमटा काढला आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतिफ यावेळी म्हणाला की, " जेव्हा तुम्ही ८० चेंडूंमध्ये ८० धावा करता तेव्हा ही चांगली गोष्ट असते. पण जेव्हा तुम्ही शतक साजरे करता आणि १३१ धावांची खेळी साकारता तेव्हा तुम्ही ती १०० किंवा १०५ चेंडूंमध्ये करायला हवी. कारण एकदा स्थिरस्थावर झाल्यावर फलंदाजाने आक्रमक फटके मारायला हवेत. पण स्मिथच्या बाबतीत तसे दिसले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात तिनशे धावांचा पल्ला ओलांडता आला नाही."