India vs Oman Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धा २०२५चा साखळी फेरीचा शेवटचा सामना आज भारत आणि ओमान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. हा सामना टीम इंडियासाठी सराव सामना असेल, कारण भारत आधीच सुपर फोरसाठी पात्र ठरला आहे, तर ओमान स्पर्धेबाहेर झाला आहे. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट संघाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे काही बडे खेळाडू सराव सत्राला अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया नेमके काय आहे प्रकरण...
सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर?
अंतिम गट फेरीच्या सामन्यापूर्वी, टीम इंडियाने एक पर्यायी सराव सत्र आयोजित केले होते, ज्यामध्ये संघातील नऊ खेळाडूंनी भाग घेतला. या पर्यायी सराव सत्रात जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, संजू सॅमसन, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांसारखे प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सहसा पर्यायी सराव सत्रात दिसतात, परंतु यावेळी हे दोन्ही स्टार अनुपस्थित होते. त्यामुळे हे संघात बदलाचे संकेत असल्याची चर्चा आहे.
सराव सत्रात कोण चमकलं?
पर्यायी सराव सत्रादरम्यान तरुण वेगवान गोलंदाज हर्षित राणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही खूप मेहनत घेतली. त्याच्या एकंदर तयारीमुळे तो ओमानविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम अकरा संघात स्थान मिळवू शकतो असा अंदाज आहे. त्याने या स्पर्धेत अद्याप एकही सामना खेळलेला नाही. याशिवाय, सत्रात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही आपल्या गोलंदाजीचा सराव केला. तर रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी फलंदाजीचा जोरदार सराव केला.