Imran Tahir T20 World Record : दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू इम्रान ताहिरनं (Imran Tahir) हा सध्या वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन लीगमध्ये खेळत आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत या पठ्यानं मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीये. कॅरेबियन प्रीमियर लीग २०२५ (CPL 2025) 2025 च्या हंगामात तो गयाना ॲमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) संघाचे नेतृत्व करत आहे. अँटीगुआ अँड बारबुडा फाल्कन्स (Antigua And Barbuda Falcons) विरुद्धच्या सामन्यात पाच विकेट्सचा डाव साधताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय. एक नजर त्याच्या खास कामगिरीवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ताहिरनं फिरकीतील जादू दाखवत मारला विश्व विक्रमी 'पंजा'
अँटीगुआ अँड बारबुडा फाल्कन्स विरुद्धच्या सामन्यात इम्रान ताहिर याने चा षटकांच्या आपल्या स्पेलमध्ये २१ धावा खर्च करत पाच विकेट्स घेतल्या. आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलाय. टी-२० क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत असताना पाच विकेट्सचा डाव साधणारा तो सर्वात वयस्क खेळाडू ठरला आहे. ४६ वर्षे आणि १४८ दिवस वयात त्याने हा पराक्रम करून दाखवलाय.
निवृत्तीनंतर पुन्हा MI फ्रँचायझीकडून खेळणार हा खेळाडू? लिलावात सर्वाधिक बेस प्राइजसह नोंदवले नाव
या गोलंदाजानं ११ चेंडूत घेतल्या होत्या ५ विकेट्स
ताहिर आधी हा विक्रम मलावी संघाचा कर्णधार मोअज्जम बेग याच्या नावे होते. सप्टेंबर २०२४ मध्ये कॅमरून विरुद्धच्या सामन्यात मोअज्जम बेग याने संघाचे नेतृत्व करताना ११ चेंडूत पाच विकेट्सचा डाव साधला होता. फक्त ४ धावा खर्च करून या गोलंदाजाने ५ विकेट्स घेतल्या होत्या. सध्याच्या घडीला तो ४० वर्षांचा आहे.
भुवीसह या स्टार गोलंदाजांच्या पंक्तीतही बसला
ताहिरनं टी-२० कारकिर्दीत पाचव्यांदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची बरोबरी केली. बुवनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ५ वेळा पाच विकेट्स हॉलचा डाव साधला आहे. याशिवाय श्रीलंकेचा माजी जलगती गोलंदाज लसिथ मलिंगा, बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन आणि पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी यांनीही प्रत्येकी ५ वेळा अशी कामगिरी केलीये. टी २० त सर्वाधिक ७ वेळा 'पंजा' मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नामीबियाच्या डेविस विसेच्या नावे आहे.