Join us

२०११ विश्वकप फायनल फिक्सिंगची चौकशी बंद; कुठलेही पुरावे मिळाले नाहीत

श्रीलंका पोलीस, माहेला जयवर्धनेचीही झाली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 06:52 IST

Open in App

कोलंबो : श्रीलंका पोलिसांनी २०११ विश्वकप फायनलमध्ये भारताविरुद्ध त्यांच्या संघाला पत्करावा लागलेला पराभव फिक्स असल्याच्या आरोपाची चौकशी शुक्रवारी बंद केली. दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा व माहेला जयवर्धने यांची चौकशी केली, पण फिक्सिंगचा कुठलाही पुरावा सापडला नाही.

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगामागे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर श्रीलंका पोलिसांच्या विशेष चौकशी विभागाने चौकशी सुरू केली. पोलीस अधीक्षक जगत फोनसेका यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘आम्ही हा अहवाल क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांकडे पाठवीत आहोत. त्यांनी आम्हाला चौकशीचे निर्देश दिले होते. आम्ही आज अंतर्गत चर्चेनंतर चौकशी संपवीत आहोत.’

फोनसेका खेळाबाबत गुन्हे रोखण्यासाठी विशेष चौकशी समितीचे प्रमुख आहेत. त्यांच्या मते, अलुथगामागे यांनी १४ आरोप केले होते पण त्याबाबत कुठलाही पुरावा मिळालेला नाही. फोनसेका म्हणाले, ‘खेळाडूंची पुन्हा चौकशी करावी, असे कुठलेही कारण दिसत नाही.’ 

शंका घेण्याचे कारण नाहीदुबई: २०११ च्या विश्वचषक फायनलवर शंका घेण्याचे काहीच कारण नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले. चौकशी होण्यासारखा कुठलाही पुरावा नाही, असे आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी म्हटले आहे. आयसीसी फिक्सिंगशी संबंधित सर्व प्रकरणे गंभीरतेने हाताळते. श्रीलंकेच्या माजी मंत्र्यांनी आरोपाच्या समर्थनार्थ कुठलाही ठोस पुरावा सादर केला नसल्याचे मार्शल यांनी सांगितले.

टॅग्स :भारतश्रीलंका