नैरोबी : आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एक विचित्र प्रकार घडला. केनिया आणि कॅमेरून यांच्यातील टी-२० सामना केवळ ३.२ षटकात म्हणजेच अवघ्या २० चेंडूत संपला. 
१९ सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅमेरूनचा डाव १४.२ षटकांत केवळ ४८ धावांमध्ये संपुष्टात आला. यानंतर केनियाने हे आव्हान ३.२ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात ५० धावा करून पूर्ण केले.  केनियाच्या यश तलाटी आणि शेम नोचे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दुसरीकडे, ऋषभ पटेलने १४ धावांची खेळी केली, तर सुखदीप सिंग याने २६ धावा केल्या. केनियाने कॅमेरूनचा तब्बल १०० चेंडू राखून पराभव केला असला तरी हा काही विश्वविक्रम नाही. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एखाद्या संघाने १०० किंवा त्याहून अधिक चेंडू राखून लक्ष्य गाठण्याची ही केवळ चौथी वेळ आहे. सर्वात कमी चेंडूंमध्ये विजय मिळवण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रियाने २०१९ मध्ये तुर्कीविरुद्ध २.४ षटकांत (१६ चेंडू) लक्ष्य गाठले होते.
कमी चेंडूंत विजय मिळवणारे
ऑस्ट्रिया     : तुर्कीविरुद्ध १६ चेंडूंत विजय (२०१९)
ओमान     : फिलिपाइन्सविरुद्ध १७ चेंडूंत विजय (२०२२)
लक्सनबर्ग     : तुर्कीविरुद्ध १९ चेंडूंत विजय (२०१९)
केनिया     : कॅमेरूनविरुद्ध २० चेंडूंत विजय (२०२२)