Join us

१६ वर्षीय पोरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हलवून टाकले; मोडला राशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड 

फिलीपिन्सच्या  १६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने चालू असलेल्या ICC ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 21:57 IST

Open in App

फिलीपिन्सच्या  १६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने चालू असलेल्या ICC ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाच विकेट घेणारा केपलर लुकीज ( Kepler Lukies) हा १६ वर्ष आणि १४५ दिवसांचा सर्वात तरुण पुरुष क्रिकेटपटू ठरला. 

लुकीजने २९ जुलै रोजी व्हॅनुआटूविरुद्धही कामगिरी केली. याआधी हा विक्रम सिएरा लिओनेचा गोलंदाज सॅम्युअल कोंतेहच्या नाववार होता. त्याने २०२१ मध्ये नारजेरियाविरुद्ध १८ वर्ष व २९ दिवसांचा असताना ट्वेंटी-२०त पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याआधी हा विक्रम अफगाणिस्तानचा राशीद खान याच्या नाववर होता. २०१७मध्ये आयर्लंडविरुद्ध त्याने १८ वर्ष व १७१ दिवसांचा असताना पराक्रम केलेला.

 ९४ धावांचा बचाव करताना लुकीजने प्रतिस्पर्धी संघाला हादरवून टाकले. त्याने तिसऱ्या षटकात क्लेमेंट टॉमीची विकेट घेऊन खाते उघडले. त्यानंतर पुढच्या षटकात त्याने ३ विकेट्स घेतल्या. अँण्डय्रू मानसेल व जोशुआ रासू यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवल्यानंतर षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने कर्णाधार रोनाल्ड तारीला बाद केले. लुकीजने पुढील षटकात ज्युनियर कल्पपाऊला भोपळ्यावर माघारी पाठवले अन्  व्हॅनुआटूची अवस्थआ ५ बाद ४० अशी केली. ल्युकीजने ४ षटकांत केवळ १० धावा देताना पाच विकेट्स घेतल्या आणि १ षटक निर्धाव टाकले.  

ल्युकीजच्या अप्रतिम गोलंदाजीनंतरही फिलीपिन्सला संघर्ष करावा लागला. नलीन निपिको व सिम्पसन ओबेड यांनी सातव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे व्हॅनुआटूने २३ चेंडू व ३ विकेट्स राखून ही मॅच जिंकली. ल्युकीजशिवाय अमनप्रीत शाहने दोन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी, फिलीपिन्सचा संघ १८.२ षटकांत ९४ धावांत तंबूत परतला. फिलीपिन्सचा हा सहाव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला, तर व्हॅनुआटूने चार साम्यांत दोन विजय मिळवून तालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. या गटातून पापुआ न्यू गिनीने सहापैकी सहा सामने जिंकून २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे.  

टॅग्स :आयसीसीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App