आशिया चषक २०२२ स्पर्धेत श्रीलंकने जेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभूत झालेला संघ आशिया चषक उंचावेल असे कुणालाही वाटत नव्हते. पण, रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दासून शनाकाच्या संघाने इतिहास घडविला. पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवून ८ वर्षांनी त्यांनी आशिया चषक उंचावला. श्रीलंकेने दुबईत ऐतिहासिक कामगिरी केली, त्याचवेळी कानपूरमध्ये श्रीलंकेचा ४५ वर्षीय माजी फलंदाज दिलशान याने Road Safety World Series स्पर्धेत शतक झळकावले. या स्पर्धेतील पहिल्या शतकवीराचा मान त्याने पटकावला.
श्रीलंका लीजंड्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया लीजंड्स सामन्यात श्रीलंकेने २० षटकांत १ बाद २१८ धावांचा डोंगर उभा केला. दिलशान व दिलशान मुनावीरा यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना २०८ धावांची विक्रमी भागीदारी केली. दिलशानने ५६ चेंडूंत १०७ धावा कुटल्या. त्याने १४ चौकार व ४ षटकार खेचून ८० धावा अवघ्या १८ चेंडूंत जमवल्या. ब्रेट लीने त्याची विकेट घेतली. मुनावीरा ६३ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ९५ धावांवर नाबाद राहिला. ब्रेट लीच्या ४ षटकांत ४५ धावा आल्या. जॉन हॅस्टींग्सने ४ षटकांत ४८ धावा दिल्या.
![]()
प्रत्युत्तरात कर्णधार शेन वॉटसन ( ३९) व कॅमेरून व्हाईट ( ३०) यांनी सुरूवात चांगली करून दिली, परंतु नंतर ऑस्ट्रेलियाची गाडी घसरली. कॅलम फर्ग्युसनने २९ धावांचे योगदान दिले. नॅथन रिर्डनने १९ चेंडूत ४६ धावा कुटल्या. पण, ऑस्ट्रेलियाला १८ षटकांत १८० धावा करता आल्या आणि श्रीलंकेने ३८ धावांनी सामना जिंकला. नुवान कुलसेकराने ३६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. चतुरंगा डी सिल्वा व जीवन मेंडीस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.