Join us

१० चौकार, १३ षटकार! ऑस्ट्रेलियन फलंदाजाने २९ चेंडूत ठोकले शतक, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड 

ऑस्ट्रेलियन फलंदाज जॅक फ्रेझर-मॅकगर्कने (  Jake Fraser McGurk) २९ चेंडूत झंझावाती शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 16:07 IST

Open in App

ऑस्ट्रेलियन फलंदाज जॅक फ्रेझर-मॅकगर्कने (  Jake Fraser McGurk) २९ चेंडूत झंझावाती शतक झळकावून अनेक विक्रम मोडीत काढले. फ्रेझरने एबी डिव्हिलियर्सचा लिस्ट ए सामन्यातील सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रमही मोडला. त्याने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. अॅडलेडमध्ये झालेल्या मार्श कपमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने तस्मानियाविरुद्ध ही वादळी फलंदाजी केली. 

प्रथम फलंदाजी करताना तस्मानियाने ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. तस्मानियाने ५० षटकांत ९ बाद ४३५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण ऑस्ट्रेलियाने झंझावाती सुरुवात केली. सलामीवीर हेन्री हंट आणि जॅक यांच्यात १७२ धावांची भागीदारी झाली. जॅकने डावाच्या ९व्या षटकात आपले शतकही पूर्ण केले. यासह त्याने डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला. यापूर्वी लिस्ट ए सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विश्वविक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर होता. त्याने २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३१ चेंडूत शतक झळकावले होते. 

१२व्या षटकात जॅक वेबस्टरच्या चेंडूवर तो बाद झाला. तो ३८ चेंडूत १२५5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.  त्याने अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने ग्लेन मॅक्सवेलचा विक्रमही मोडला. यापूर्वी मॅक्सवेलच्या नावावर ऑस्ट्रेलियाच्या वन डे सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम होता. त्याने १९ चेंडूत अर्धशतक केले होते. जॅकने ९व्या षटकात सलग तीन षटकार आणि १०व्या षटकात सलग चार चौकार आणि एक षटकार लगावला. त्याने एकूण १० चौकार व १३ षटकार खेचले. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाएबी डिव्हिलियर्स